उत्तराखंडच्या भामट्याची मुंबई विमानतळाबाहेर लुटमार

सामना ऑनलाईन । मुंबई

मी दिल्लीचा रहिवासी असून हिरे व्यापारी आहे. पहिल्यांदाच मुंबईत आलोय. मला शहराची काहीच माहिती नाही. त्यात माझ्यासोबत आलेल्या माझ्या कामगारांनी भूल देऊन माझा लॅपटॉप, पैसे, दागिने, फोन चोरून नेला आहे, काहीही करून मला विमानतळापर्यंत घेऊन चला, अशी बतावणी करून नागरिकांना फूस लावून तो विमानतळ परिसरात न्यायचा आणि तेथे त्यांना लुटायचा. गेल्या अनेक दिवसांपासून अशा प्रकारे लुटमार करणार्‍या भामट्याला सिक्युर वन या सिक्युरिटी कंपनीच्या अधिकार्‍यांनी पकडले आहे.

आत्मज भीमसिंह राणा असे त्या आरोपी तरुणाचे नाव असून तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. सध्या तो मुंबईत चेंबूरमध्ये राहतो. राणाने गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना लुटण्याचा सपाटाच लावला होता. गुन्हा करण्याची त्याची मोडस् ऑपरेंडी वेगळीच आहे. मुंबई सेंट्रल येथे राहणार्‍या यश जाधव याला राणाने लुबाडले होते. यश दादर येथे शाळेत दहावी इयत्तेत शिकतो. 7 तारखेला तो घरी जाण्यासाठी दादर स्थानकाजवळ आला असता त्याला राणाने अडविले. मी संकटात सापडलो आहे. मी हिरे व्यापारी असून माझ्या कामगारांनी माझे पैसे, सर्व सामान चोरून नेले आहे. त्यात मला मुंबईची काहीच माहिती नाही. विमानतळावर माझे आईवडील येणार आहेत. मला काही करून तेथे सोड अशी गयावया तो करू लागला. माणुसकीच्या दृष्टीने यश त्याला टॅक्सीने विमानतळावर घेऊन गेला. तेथे गेल्यावर जरा वडिलांना फोन करायला मोबाईल दे अशी बतावणी करीत त्याने यशचा फोन घेतला. मग रेंज मिळत नसल्याचा बहाणा करीत मोबाईल घेऊन पसार झाला. याबाबत यशने सहार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली.

विमानतळ परिसरात वारंवार अशा घटना घडू लागल्यामुळे ‘सिक्युर वन’ या सिक्युरिटी कंपनीचे प्रमुख अश्विनीकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण माने, नितीन वरणकर, पिंटू जंगम, गणेश तेलशेट्टी, दिनेश यादव या पथकाने वॉच ठेवला होता. अखेर गेल्या आठवड्यात पुन्हा एका नागरिकाला लुटण्याच्या तयारीत असतानाच राणावर पथकाने विमानतळ परिसरात झडप घालून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

  • ज्यांच्याकडे मोबाईल आहे. लॅपटॉप वगैरे साहित्य आहे अशांना राणा हेरतो. मग माझे सामान कामगारांनी चोरून नेले आहे. आईवडील विमानाने आले आहेत, पण मुंबईची काहीच माहिती नसल्याने तेथे कसे जायचे माहीत नाही. काहीही करून विमानतळापर्यंत मला नेऊन सोडा अशी गयावया तो करतो.
  • तरीदेखील त्याच्यासोबत जाण्यास कोणी तयार नाही झाले की तो रडण्याचे नाटक करून दाखवतो. यामुळे त्याच्यावर दया दाखवून सोबत येण्यास कोणी तयार झाला की विमानतळ परिसरात नेऊन राणा संबंधितांचा मोबाईल किंवा साहित्य शिताफीने लंपास करतो. अशा प्रकारे त्याने अनेकांना लुटल्याचे सांगण्यात आले.