नांदेडमध्ये १८ लाख ९० हजारांचा गांजा जप्त

33

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडमधील हदगाव तालुक्यातील हळेगाव (मालेगाव) येथे एका शेतात गांजाची लागवड करुन त्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतावर स्थानिक गुन्हा शाखेने धाड टाकून शेतातील सुकलेला गांजा व ओला गांजा असा एकूण १८ लाख ९० हजार रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी केशव वामन हुरदुके (६३) याला अटकही करण्यात आली आहे.

रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग भारती यांनी सदरच्या गावाला भेट दिली. हदगाव तालुक्यातील हळेगाव (मालेगाव) या गावात शेतकरी आपल्या शेतामध्ये गांजाची लागवड करुन तो बाजारात गुपचूप विकत असल्याची माहिती प्राप्त झाली. गावातील काही मंडळींना विश्वासात घेवून काल रात्रीपासून याबाबत शोध मोहिम सुरू करण्यात आली. त्यानुसार शेत गट क्र.६५ जवळ हळेगावच्या हद्दीतील डोंगराच्या पायथ्याशी सदरचे पथक पोहचले. त्या शेतात एकूण एक एकर परिसरात कापूस आणि तुरीच्या पिकामध्ये गांजा या अंमली पदार्थाची लागवड केलेली होती.

काल रात्रीपासून याबाबतच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी आज (सोमवारी) तेथे सुकलेला २७ किलो गांजा आणि ओला ८१० किलो गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची व इतर साहित्याची एकूण किंमत १८ लाख ९० हजार रुपये एवढी होते.गांजा विक्री करण्यासाठी आवश्यक असलेला वजन काटा सुध्दा याच शेतातून जप्त करण्यात आला आहे. सदरच शेतीचा मालक केशव वामन हुरदुके (६३) यालाही पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुध्द अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलम २० (१) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केशव लटपटे व स्थागुशाच्या पांडूरंग भारती हे बाबत पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या