हत्या झालेली मुलगी प्रियकरासोबत परतली, हत्येच्या आरोपाखाली वडील, भाऊ मात्र सात महिन्यांपासून तुरुंगात

3675

घराच्यांनी लग्नाला विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. इकडे मुलीच्या भावाने मुलाच्या कुटुंबाविरुद्ध अपहरणाची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांना अटकही केली. काही महिन्यानंतर मुलीच्या हत्येच्या आरोपाखाली तिचे वडील, भाऊ तसेच इतर नातलगांना पोलिसांनी अटक केली. गंमत म्हणजे कोरोना लॉकडाऊनमध्ये ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत सासरी परतली!

अमरोहा जिल्ह्यातील सुरेश सिंह यांची अल्पवयीन मुलगी २० फेब्रुवारी २०१९ रोजी बेपत्ता झाली. तिचा भाऊ रुपकिशोर याने आपल्या बहिणीला होराम, हरफूल, जयपाल व सुरेंद्र या चौघांनी पळवून नेल्याची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी होराम व हरफूल यांना अटक केली. जंग जंग पछाडूनही मुलीचा शोध लागला नाही. त्यानंतर पोलिसांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी सुरेश सिंह, रुपकिशोर, देवेंद्र यांच्या विरोधात मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आणि या सर्वांना तुरुंगात पाठवले. हत्येसाठी वापरलेला गावठी कट्टा आणि कपडे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता. सात महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत.

लॉकडाऊनमध्ये मुलगी परतली
प्रियकरासोबत पळालेल्या मुलीने थेट दिल्ली गाठली आणि संसार मांडला. दोन-तीन महिने व्यवस्थित चालले. पण कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि दोघांची उपासमार सुरू झाली. त्यामुळे या दोघांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. दोघेही पौरारा या आपल्या गावी आले. एक दिवस अचानक मुलीचा दुसरा भाऊ राहुल हा पौरारा येथे आला. त्यावेळी त्याला आपली बहिण जिवंत असल्याचे पाहून धक्काच बसला. त्याने ही बाब पोलिसांच्या कानावर घातली. पोलीस अधीक्षकांनी थेट मुलीलाच बोलावून चौकशी केली तेव्हा सत्य समोर आले. आता खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी मुलीच्या कुटुंबाने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या