‘मैत्री, फ्रेंडशीप करा’ जाहिरातीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक, टोळी गडाआड

महेश उपदेव । नागपूर

मैत्री करा, फ्रेंडशीप सारख्या जाहिराती वृत्तपत्रांना देऊन मैत्रीच्या आड आंबटशौकीन तरुणांची लाखो रुपयांनी फसवणूक करणाऱ्या एका टोळीला गजाआड करण्यात आले आहे. या टोळीत 4 महिलांचा समावेश असून त्यांनाही अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रपरिषदेत दिली. रितेश उर्फ भेरूलाल भगवानलाल चामार (बैरवा) (वय 34) रा. कासर वडवली, घोडबंदर रोड, ठाणे (प.), सुवर्णा मिनेश निकम (33) नेरळ, नवी मुंबई, पल्लवी विनायक पाटील (21) ठाणे, शिल्पा समीर सरवटे (52) डोंबीवली, मुंबई आणि निशा सचिन साठे (24) येरवडा, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका वृत्तपत्रात निशा फ्रेंडशीप क्लबच्या नावाने जाहिरात आली होती. या जाहिरातीत हाय प्रोफाईल मॅडम, हाऊस वाईप, एअर होस्टेस, डॉक्टर, इंजीनियर मैत्री एन्जॉय दोन तासात कमवा रोज 20 हजार रुपये असा मजकूर होता. ही जाहिरात वाचून सक्करदरा हद्दीतील एका तरुणाने जाहिरातीत दिलेल्या फोन क्रमांकावर संपर्क साधला. पलीकडून मंजुळ आवाजात एक तरुणी बोलली. तरुणीने या तरुणाला एक हजार रुपये भरून नोंदणी करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या तरुणीने या युवकाला नोकरीसोबतच लैंगिक प्रलोभन दिले. त्यानंतर विविध कारणासाठी त्या तरुणीने त्याला पैसे भरण्यास भाग पाडले. तरुणाने पत्नीचे काही दागिने विकून, तर काही दागिने गहाण ठेवून या टोळीला 1 लाख 26 हजार रुपये पाठविले. पैसे पाठवून देखील टोळीकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसगत झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

अगोदरच बेरोजगारी आणि त्यातही आर्थिक फसवणूक झाल्याने या युवकाचे मानसिक खच्चीकरण झाले होते. त्याच्या स्वभावात देखील बदल झाला होता. हा प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात आला. पत्नीने त्याची विचारपूस केली असता त्याने काहीच सांगितले नाही. त्यामुळे पत्नीने सक्करदराचे पो. नि. संदीपान पवार यांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकार सांगितला. पवार यांनी त्या तरुणाची भेट घेऊन त्याला विश्वासात घेतले. त्याची सखोल विचारपूस केली. मात्र, पोलिसात तक्रार द्यायला तरुण तयार नव्हता. माझे पैसे मला परत मिळवून द्या. मला तक्रार करायची नाही असेही तो पवार यांना म्हणाला होता. मात्र, या प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे हे पो. नि. पवार यांच्या लक्षात आले. पुन्हा त्याला विश्वासात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

असा लागला छडा
ज्या मोबाईल क्रमांकावरून तरुणाला फोन आले होते त्या फोनची तांत्रिक पद्धतीने तपास करण्यात आला. त्यात काही फोन ठाणे, भिवंडी येथून आले होते. ज्या खात्यात पैसे टाकण्यासाठी सांगितले होते ती बँक पुण्याची होती. या प्रकरणात वापरण्यात आलेले मोबाईल क्रमांक, बँक खात्यांना दिलेले नाव व पत्ते हे खोटे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता आरोपी हे मुंबई, ठाणे, पुणे परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांच्या दोन पथकांना मुंबई, ठाणे, पुणे येथे पाठविण्यात आले. पुण्याच्या बँक खात्यातील रक्कम ही ठाणे परिसरातून अनेकदा काढल्या गेल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांनी ठाणे कापूर बावडी येथील एटीएमभोवती सापळा रचला. 18 ऑगस्ट रोजी रितेश उर्फ भेरूलाल हा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये आला असता पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर इतर चार महिलांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याजवळून 11 मोबाईल, 2 सीपीयू, 1 लॅपटॉप, 25 सीम कार्ड, 27 एटीएम कार्ड आणि रोख 32 हजार 600 रुपये असा 1 लाख 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असेही भरणे यांनी पत्रकारांना सांगितले.