सवा दोन कोटींचे सोनं लांबवणाऱ्या नोकराला घातल्या बेड्या

22

सामना प्रतिनिधी । मुंबई

कळवादेवी मुंबई येथील एका सोन्याच्या व्यापाऱ्याचे ७.५ किलो वजनाचे २ कोटी २४ लाखांच्या किंमतीचे सोनं घेऊन फरार झालेल्या मनोहरसिंग जोधा या नोकराला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या सोन्यापैकी ६.३ किलो वजनाचे १ कोटी ९० लाखांचे सोनं जप्त करण्यात आले आहे. मागच्या महिन्यात ३० जुन रोजी ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहरसिंग नावाचा नोकर हैद्राबाद येथील व्यापाऱ्याकडून ७.५ किलो वजनाचे सोनं घेऊन लग्झरी बसने मुंबईकडे येत होता. सोन्याबाबत लालसा निर्माण झाल्याने मनोहरसिंगने चोरीचा बनाव रचण्याचे षडयंत्र रचले. मुंबईत आल्यावर त्याने मालकाला खोटी माहिती दिली. प्रवासादरम्यान गुंगीचे औषध देऊन आपल्याकडील सोनं चोरीला गेल्याचे त्याने मालकाला सांगितले.

नोकराने दिलेल्या माहितीवर विश्वास बसल्याने मनोहरसिंगसोबत व्यापारीही काळाचौकी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यासाठी गेले. कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून मनोहरसिंगने पोलीस स्थानकातून धूम ठोकली. त्यामुळे पोलिसांचा नोकरावरील संशय बळावला. पोलिसांनी वेगाने सुत्र हलवत तीन पथके तयार केली. दोन पथके हैदराबाद आणि राजस्थानकडे, तर तिसरे पथक मुंबई येथे तपास करत होते.

दरम्यान, समतानगर पोलिसांना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मनोहरसिंग आणि त्याचा साथिदार नारायणसिंग राठोड यांना अटक केली. त्यांच्याकडून ४ किलो सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आतापर्यंत चोरीला गेलेल्या सोन्यापैकी ६.३ किलो वजनाचे १ कोटी ९० लाखांचे सोनं हस्तगत करण्यात यश आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या