पैसे काढायला आला आणि तुरुंगात गेला, बल्गेरियन नागरिकाला अटक

94

सामना प्रतिनिधी । मुंबई

महिलेच्या बँक खात्यातील पैसे काढणाऱ्या मिलान दवर्णासका या बल्गेरियन नागरिकाला वांद्रे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार या बँकेत काम करतात. 18 जुलैला त्यांना मोबाईलवर 40 हजार रुपये काढल्याचे एसएमएस आले. त्यांनी तत्काळ ते कार्ड बंद केले. त्यानंतर वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक गिरीश अणावकर यांच्या मार्गदर्शनाखालीपोलीस उपनिरीक्षक भीमसेन गायकवाड आणि पथकाने तपास सुरू केला. ज्या एटीएममधून पैसे काढले त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीची पाहणी केली. त्यानंतर सध्या वेशातील पोलीस तेथे 24 तास तैनात केले.

शनिवारी मिलान हा दुसर्‍यांदा पैसे काढण्यासाठी त्या एटीएममध्ये आला. त्याच्या हालचाली आणि कपडे यावरून त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. मिलान हा महिनाभरापूर्वी मुंबईत आला होता. तो एटीएममध्ये स्किमर बसवून डेटा चोरी करणाऱ्या किंवा ऑनलाइन हॅकर टोळीतील असावा असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी त्याच्याकडून काही बँकांची कार्ड जप्त केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या