सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांना चंद्रपूर पोलिसांनी केली अटक

883

शहीद भगतसिंग यांच्याविरुद्ध चालवण्यात आलेल्या खटल्यात ब्रिटिशांची बाजू मांडणारा वकील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता होता, अशी पोस्ट फेसबूकवर टाकल्याप्रकरणी सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटचे संयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भाजप आयटी सेलचा कार्यकर्ता राहुल लांजेवार याने तक्रार केली होती. त्यावरून पोलिसांनी ही अटक केली. या घटनेमुळे दिवसभर शहरात तणावाचं वातावरण होतं. दरम्यान, न्यायालयानं धोटे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ते बळीराज धोटे यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टविरोधात जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या. या तक्रारींची एकत्र दखल घेत पोलिसांनी धोटे यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी ही अटक कोणत्या पोस्टसाठी केली, हे जाहीर केले नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. धोटे यांना अटक केल्याची माहिती मिळताच काही लोकांनी रोष व्यक्त केला. तसेच पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना समर्थन जाहीर केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. अटक होण्यापूर्वी धोटे यांनी एक व्हीडीओ फेसबुकवर टाकत आपल्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा आरोप केला.

भाजप कार्यकर्त्यांनी धोटे यांच्या निषेधार्थ निदर्शनं करीत त्यांचा पुतळा जाळला. धोटे नेहमीच भाजपविरोधी आणि आक्षेपार्ह मजकूर समाजमाध्यमात पोस्ट करीत असतात, असा आरोप करून त्यांना जिल्ह्यातून तडीपार करावं, अशी मागणी महापौर अंजली घोटेकर यांनी केली. या प्रकरणामुळे आता राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

आपली प्रतिक्रिया द्या