पोलीस ठाण्यातील चोरीचा छडा लावण्यात जयसिंगपूर पोलिसांना आठवड्याने यश

444

पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षातून आठवड्याभरापूर्वी तब्बल 185 मोबाईल संच चोरीला गेल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी आठवड्याभराने या प्रकरणातील संशयिताला ताब्यात घेतले आहे. एका गुन्ह्यात सापडलेला स्वतःचा मोबाईल पळवून नेतानाच या संशयिताने अन्य मोबाईलही नेऊन साथीदाराच्या मदतीने नदीत टाकून दिल्याचे तपासात उघड झाले आहे. कोम्बिंग ऑपरेशनद्वारे झोपडपट्टीधारकांच्या रोषाला पात्र ठरलेल्या पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. रघुनाथ बाळासो कदम (वय 28), विकास ऊर्फ पवन विलास पाटील (वय 21, दोघे रा. राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलीस उप अधीक्षक किशोर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित रघुनाथ हा पोलीस ठाण्याच्या बोळभागात येताना एका बँकेच्या सीसीटीव्हीत कैद झाला. येथील श्रीमाता पतसंस्थेत चोरी केल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्याकडून 72 हजार रुपये व दोन मोबाईल संच जप्त केले होते. यापैकी त्याच्या मैत्रिणीचा असलेला मोबाईल न्यायालयाकडून त्याला परतही मिळाला होता. पण अन्य एक मोबाईल पोलीस ठाण्यातच होता. चौकशीसाठी मुद्देमाल कक्षानजीकच्या खोलीत असताना त्याने तेथील हालचालींवर नजर ठेवली होती. 8 जानेवारी रोजी मध्यरात्री पोलीस ठाण्याच्या आग्नेय बाजूकडील मुद्देमाल कक्षाच्या खोलीच्या पाठीमागील कंपाऊंड वॉलवरून त्याने पोलीस ठाण्यात प्रवेश केला. खिडकीतून हात घालून मुख्य दरवाज्याचे कडी-कोयंडा काढसा आणि आत शिरला. स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने कपाट उघडून त्याने आपल्या मोबाईलसह अन्य 184 मोबाईलही लंपास केले.

खबरे व सीसीटीव्ही फुटेज यावरून रघुनाथ कदम हाच संशयित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आपण मोबाईल चोरून आपला मित्र विकास ऊर्फ पवन याच्याद्वारे अर्जुनवाड पुलावरून नदीत टाकल्याचे त्याने कबूल केले. त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. संशयितांनी दिेलेल्या माहितीनुसार अर्जुनवाड येथील कृष्णा नदीवरील पुलावरून टाकलेले मोबाईलचे गाठोडे पाणबुड्यांच्या साह्याने काढण्यात आले. त्याचा पंचनामा करून संशयितांना पुन्हा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आणले आहे.

या चोरीने राज्यभरात खळबळ उडाली होती. वरिष्ठांनी फैलावर घेतल्याने जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, हातकणंगले, सांगली गुन्हे अन्वेषण शाखा आदी पथके स्थापन करण्यात आली. या तपासावर जिल्हा पोलीस प्रमुख, अपर पोलीस अधीक्षक लक्ष ठेवून होते. दबाव वाढल्याने पोलिसांनी शहरातील विविध झोपडपट्टी भागात कोम्बिंग ऑपरेशन राबविले होते.

आपली प्रतिक्रिया द्या