साडेसहा कोटींच्या ७१ कारचोरीचा ‘कारनामा’, पोलिसांनी केला पर्दाफाश

42

सामना प्रतिनिधी । ठाणे

बीएमडब्ल्यू, होंडा अमेझ, रेनॉल्ट, होंडा, शेवर्लेट, झेस्ट, टोयाटो, स्विफ्ट, इनोव्हा अशा अलिशान कार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून कारमालकांना साडेसहा कोटींचा गंडा घालण्याच्या तयारीत असलेल्या कारचोर टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ठाणे पोलिसांच्या सोनसाखळी चोरीविरोधी पथकाने मोठ्या शिताफीने तपास लावून मुंब्रा-दिव्यातील या कारचोरी त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या. या चोरलेल्या ७१ कार आज मूळ मालकांना परत देण्यात आल्या.

अनुराग तिवारी (४१), रोहित घरत (२९) आणि राजेंद्र यादव (३५) या त्रिकुटाने श्रीकांत राय या ड्रायव्हरला गाडी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भाड्याने लावून मोठी रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. श्रीकांतसोबत या त्रिकुटाने बनावट करार करून १५ हजार रुपयेही उकळले. त्यासाठी श्रीकांतने बँकेतून कर्ज घेऊन गाडी घेतली व या त्रिकुटाच्या हवाली केली. परंतु गाडी दिली तरी भाडे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

असा झाला पर्दाफाश

श्रीकांत राय याने केलेल्या तक्रारी सारखीच डोंबिवली पोलीस ठाण्यात रोहित घरत याच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना होता. पोलीसांनी सापळा रचून अनुराग, रोहित व राजेंद्रच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी त्यांनी अशा ७१ कारमालकांची फसवणूक करून त्यांच्या गाड्या मुंब्रा, दिवा, भांडुप येथे लपवून ठेवल्याचे सांगितले. या गाड्या परस्पर विकून मालामाल होण्याचा त्यांचा प्लॅन होता अशी कबुली या त्रिकुटाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या