एटीएम कार्डचे क्लोन तयार करुन पैसे चोरणारी टोळी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

1049

एटीएम कार्डचा डाटा चोरुन त्या आधारे बनावट (क्लोन) एटीएम कार्ड तयार करुन लोकांची फसवणूक करणारी टोळी शेगाव येथून जेरबंद करण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये सध्या लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने बँक एटीएम कार्डचा डाटा चोरुन त्या आधारे बनावट (क्लोन) एटीएम कार्ड तयार करुन लोकांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. अशा घटनांचे जिल्ह्यातील वाढते प्रमाण लक्षात घेता त्यावर नियंत्रण घालणेकामी व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भुजबळ यांनी स्थनिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करीत शाखेचे पथक तयार करण्यात आले होते.

सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेगाव शहरात असताना माहिती मिळाली की, शेगाव शहरातील सिध्दी विनायक लॉजमध्ये काही परप्रांतीय राहत असून त्यांच्या हालचाली संशयास्पद आहेत. या माहितीनुसार पथकाने सिध्दी विनायक लॉजवर छापा टाकूला. तेथे अनिल धर्मविर (19, रा. रोहनात गाव, हरियाणा), रोहीत पृथ्वीसिंग (32, रा. रोहछम, हरियाणा), सतिश उर्फ संजय बियासिंग (28, रा. पाहीगाव,हरियाणा) अशा तीन व्यक्ती आढळल्या. त्यांची व खोलीतील त्यांच्या बॅग व इतर सामानाची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातून एक एचपी कंपनीचा लॅपटॉप, एक मोठे डेफ्टन स्कॅनर, दोन लहान डेप्टन स्कॅनर, लॅपटॉप चार्जर, दोन डाटा केबल, कोरे व्हीआयपी एटीएम कार्ड 11, क्लोन (बनावट) केलेले 6 एटीएम कार्ड, 4 मोबाईल व 15,510 रुपये रोख असा एकूण 1,33,215 रुपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला.

ते सर्व जण हरियाणा राज्यातील राहणारे असून ते महाराष्ट्रामध्ये दिल्ली येथून विमानाने शिर्डी येथे येतात. तेथून राज्यातील इतर शहरामध्ये एटीएम कार्ड क्लोनिंग करतात व निघून जातात. या वेळी शेगाव येथे दोन गटात आले असून एका गटात तिघे व दुसर्‍या गटात दोनजण आहेत. हे सर्वजन एटीएम सेंटरवर जात लोकांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याच्या उद्देशाने त्यांचे एटीएम कार्ड घेऊन त्यांची नजर चुकवुन लगेच यांच्या जवळील छोट्या डेप्टन स्कॅनर वरुन ते एटीएम कार्ड स्कॅन करुन घेतात. त्यामुळे एटीएम कार्डवरील सर्व डाटा यांच्या जवळील छोट्या स्कॅनर मध्ये सेव होतो. त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा पिन कोड नंबर पाहून तो लक्षात ठेवतात. त्यानंतर खोलीत जाऊन लॅपटॉपला छोटे डेफ्टन स्कॅनर जोडून स्कॅनरमध्ये आलेला डाटा लॅपटॉपच्या सहाय्याने दुसर्‍या मोठ्या डेफ्टन स्कॅनरमध्ये कोरे एटीएम कार्ड टाकून कार्ड क्लोन करुन घेवून बनावट एटीएम कार्ड तयार करतात. उशीरा रात्री कोणत्याही एटीएम सेंटरवर जावून बनावट एटीएमच्या सहाय्याने पैसे काढतात. त्यांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे नेतृत्वात सपोनि नागेश चतरकर, पोउपनि योगेश दंदे, एएसआय अनिल भुसारी, पोहेकॉ. विकास खानजोडे, पोना. रघुनाथ जाधव, लक्ष्मण कटक, पंकजकुमार मेहेर, श्रिकांत चिंचोले, उमेश बोरसे, अनिल बरींगे यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या