आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पती व सासूला न्हावाशेवा पोलिसांच्या बेड्या

सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा

मुलगा होत नसल्याने सासरची मंडळी मानसिक व शारिरिक त्रास देत असल्याने उरणच्या डोंगरी गावातील एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. प्रगती राकेश पाटील असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल न्हावाशेवा पोलिसांनी नवरा व सासूला अटक केली आहे. न्यायालयांने या दोघांना १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

मयत महीला प्रगती राकेश पाटील (३०) या विवाहीतेच्या लग्नाला सात वर्षे झाली असून तिला एक वर्षाची आणि दुसरी पाच वर्षांची अशा दोन मुली आहेत. मात्र त्यांना मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तिचा पती व सासू तिचा सतत मानसिक व शारिरिक छळ करत असत. सततच्या छळाला कंटाळून या महिलेने डोंगरी येथे राहत्या घरी गळफास घेतला व आत्महत्या केली.

याबाबत विवाहितेचे वडील नरेश धनाजी म्हात्रे (६२) रा. जासई यांनी न्हावाशेवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. न्हावाशेवा पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केल्यानंतर पती राकेश अविनाश पाटील (३२) व सासू आशा अविनाश पाटील (६०)या दोघांना भा.द.वि.३०६,३४ कलमान्वये तात्काळ अटक केली असून, त्यांना न्यायालया समोर हजार केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणी न्हावाशेवा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.