
मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये, यासाठी रवींद्र टोंगे या युवकाने सोमवारपासून चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे, हे आंदोलन संपवण्यासाठी काल आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले. मात्र वेळीच ओबीसी नेते तिथे पोचल्याने टोंगे यांना उचलणे पोलिसांना शक्य झाले नाही.
‘पोलीस आणि जिल्हा प्रशासनानं हे आंदोलन संपवण्यासाठी केलेल्या या कृत्याचा ओबीसी महासंघाने आता निषेध केला आहे. उपचार करण्याच्या नावाखाली उपोषणकर्ते टोंगे यांना रुग्णालयात हलवून हे आंदोलन संपवण्याचा कट होता’, असा आरोप ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी यावेळी केला. ‘जरांगे पाटलांचे उपोषण सुरू असताना त्यांच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक उपोषण मंडपात हजेरी लावते. पण संख्येने 60 टक्के असलेल्या समाजाचे आंदोलन दडपण्यासाठी असली कृत्ये केली जातात. हा कुठला न्याय आहे’, असा सवाल ही यावेळी उपस्थित केला.
‘उपचार करायचे असतील तर मंडपात येवून करा. मागण्या मंजूर होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही’, असा इशाराही महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी सरकारला दिला आहे.