धक्कादायक! रुग्णाला सोडण्यासाठी जाताना पोलिसांची मारहाण, रुग्णवाहिका चालकाच्या वडिलांचा मृत्यू

16785
प्रातिनिधिक

बोरिवली येथून श्रीगोंदा येथे रुग्णाला घरी सोडविण्यासाठी घेऊन जात असताना टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका अडवली. एका पोलिसाने चालकाच्या वडिलांना काठीने मारहाण केली. यामध्ये मारहाण झालेल्या व्यक्तीचा काही अंतर पुढे गेल्यानंतर मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली.

नरेश शिंदे (वय 49, रा. ठाणे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत नरेश यांचा मुलगा निलेश शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. शिंदे यांची रुग्णवाहिका ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. ते गुरुवारी रात्री एका रुग्णाला घेऊन बोरिवली येथून नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे निघाले होते. प्रवासाचे अंतर जास्त असल्याने निलेश यांनी त्यांचे वडील नरेश यांना सोबत घेतले. सुरुवातीला मुंबईपासून पुण्यापर्यंत नरेश यांनी रुग्णवाहिका चालवली. त्यानंतर त्यांना झोप लागत असल्याने रुग्णवाहिका चालविण्यासाठी निलेश याच्याकडे देऊन ते झोपी गेले.

दुपारी एकच्या सुमारास त्यांची रुग्णवाहिका मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर आली. तिथे थांबलेल्या वाहतूक पोलिसांनी निलेश यांना खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर एका वाहतूक पोलिसाने नरेश यांच्या पाठीत जोरात काठी मारली. तर दुस-या वाहतूक पोलिसाने नरेश यांना तुम्ही प्रवासी घेऊन जात असल्याचे म्हणत एका अधिका-याकडे नेऊन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच तडजोड म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली. मात्र नरेश यांच्याकडे पाच हजार रुपये नसल्याने रुग्णवाहिकेत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक असल्याने त्यांनी तीन हजार रुपये देऊन प्रकरण मिटवले.

नरेश यांनी त्यांची रुग्णवाहिका साधी असून कार्डियाक रुग्णवाहिका नाही. त्यामुळे या रुग्णवाहिकेत सोबत डॉक्टर नसतात, असे पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्यांना प्रवासी वाहून नेत असल्याचे म्हणत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असल्याचेही निलेश यांनी सांगितले.

त्यानंतर निलेश रुग्णवाहिका घेऊन चाकणच्या दिशेने गेले. चाकणच्या पुढे गेल्यानंतर नरेश यांनी जीभ बाहेर काढून मान टाकली. वडिलांना त्रास होत असल्याने निलेश यांनी काही रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयांनी दाखल करून घेतले नाही. शेवटी शिक्रापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

दरम्यान, हा प्रकार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी गेला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर आयुक्त पोकळे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या