धक्कादायक! अजून बलात्कार झालेला नाही, झाल्यावर तक्रार नोंदवा; पोलिसांचा उद्दामपणा

1726

उन्नाव बलात्कार प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणातील पीडितेला जिवंत जाळण्यात आले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आता उन्नावमध्ये पोलिसांचा उद्दामपणा उघड झाला आहे. एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नराधमांपासून कशीबशी सुटका करत तिने पळ काढला. त्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी तिने पोलीस ठाणे गाठले. घटलेल्या घडनेची माहिती तिने पोलिसांना दिली. तुमच्यावर अजून बलात्कार झालेला नाही. बलात्कार झाल्यानंतर तुमची तक्रार नोंदवून घेऊ, असे उत्तर पोलिसांनी दिले आहे. आपली तक्रार कोणत्याही अधिकाऱ्याने नोंदवली नसल्याने आपल्याला भीती वाटत असल्याचे पीडितेने सांगितले. या घटनेमुळे पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत आहे.

आपण तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ केली. आता फक्त बलात्काराचा प्रयत्न झाला आहे. तुमच्यावर बलात्कार झालेला नाही. ज्यावेळी होईल, त्यावेळी तक्रार नोंदवा, असे उत्तर देत आपल्याला पोलीस ठाण्यातून बाहेर काढण्यात आल्याचे पीडितेने सांगितले. आता काही नराधम आपल्या मागावर आहेत. एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर पोलीस काय करणार आहेत, आता आपण जिवंत आहोत. घटनेनंतर आपले काय होईल, ही भीती सतावत असल्याचे तिने सांगितले. आपण तीन महिन्यांपासून तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले. आपण औषधे घेऊन परतत असताना काहीजणांनी आपल्याला अडवून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आपण 1090 वर फोन करून मदत मागितली. 100 क्रमाकांचे वाहन तुमच्या मदतीसाठी येईल, असे सांगण्यात आले. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहचलेच नाहीत. त्यानंतर आपण उन्नाव पोलीस कप्तान यांच्या कार्यालयात फोन केला. ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा, असे आपल्याला सांगण्यात आले. आपण न्यायालयातही याबाबतची तक्रार दिली आहे. मात्र, पोलिसांनी अजूनपर्यंत कोणालाही अटक केली नसल्याचे पीडितेने सांगितले.

आतापर्यंत पोलिसांच्या सूचनेनुसार आपण विविध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलो आहोत. मात्र, कोणीही दखल घेतली नसल्याचे तिने सांगितले. उन्नावमध्येच 30 पेक्षा जास्त वेळा आपण पोलीस ठाण्यात गेल्याचे तिने सांगितले. तेथून पोलीस कप्तान यांच्या कार्यालयात पाठवतात. तिथे घटना घडली त्याठिकाणी तक्रार नोंदवण्यास सांगून पिटाळून लावतात, असे पीडितेने सांगितले. पोलीस मदत करण्याऐवजी शेरेबाजी करतात, असा आरोपही तिने केला आहे. या घटनेमुळे पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत आहे. ‘आज तक’ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या