सक्तीच्या रजेवर असलेल्या पोलिसाचे पोलीस ठाण्यात सेलिब्रेशन!

सामना प्रतिनिधी । जयसिंगपूर

शिरोळ येथील राजाराम माने या तरुणाच्या आत्महत्येनंतर शिरोळचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांची मुख्यालयात बदली, कॉन्स्टेबल भुजंग कांबळे याचे निलंबन व उपअधीक्षक रमेश सरवदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. मात्र, रजेवर असणाऱया उपअधीक्षक सरवदे यांनी चक्क जयसिंगपुरातील उपअधीक्षक कार्यालयातच केक कापून आपला वाढदिवस साजरा केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

शिरोळ येथे काही दिवसांपूर्वी राजाराम महादेव माने या टेम्पोचालक तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी निखिल खाडे, शशिकांत साळुंखे, स्वाती माने व कॉन्स्टेबल भुजंग कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कॉन्स्टेबल कांबळे यास पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे हे पाठीशी घालत असल्याचा आरोप शिरोळ ग्रामस्थांनी केला होता.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते यांनी कॉन्स्टेबल कांबळे यास निलंबित केले. शिरोळचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांची तातडीने मुख्यालयात बदली करण्यात आली; तर जयसिंगपूर विभागाचे उपअधीक्षक रमेश सरवदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. सांगलीचे अनिकेत कोथळे प्रकरण ताजे असतानाच, शिरोळच्या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणात कॉन्स्टेबलच्या सहभागाच्या संशयामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेस डाग लागला आहे. या प्रकरणात शिंदे नामक पोलीस कर्मचारी रडारवर आहे. आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करून छडा लावण्याच्या कामाला प्राधान्य देण्याऐवजी उपअधीक्षक रमेश सरवदे यांनी जयसिंगपूर येथील आपल्या कार्यालयात केक कापून अन् फेटा बांधून वाढदिवस साजरा केला. रजेवर पाठविलेल्या दिवशीच त्यांनी साजरा केलेल्या वाढदिवसाची छायाचित्रे सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने शिरोळ तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.

police

आपली प्रतिक्रिया द्या