आदेश धुडकावून भाजप आमदाराने केली विठ्ठलाची पूजा, गुन्हा दाखल

1586

कोरोना महामारी संकटाचा मुकाबला करण्यासाठी घरामध्येच राहा, बाहेर पडलात तर सुरक्षित अंतर ठेवा असे सक्त निर्देश देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जात असताना त्यांच्याच पक्षाचे धाराशिवचे आमदार व पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य सुरजितसिंह ठाकूर यांनी मात्र आदेश धुडकावून लावत श्री विठ्ठलाची पूजा केली. संचारबंदी अन जिल्हाबंदी असताना ठाकूर यांनी आपत्ती व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संचार बंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि साथी रोग प्रतिबंधक अधिनियमाची सोलापूर जिल्ह्यात चोख अंमलबजावणी आहे. या अंमलबजावणीमुळे चारच दिवसापूर्वी आलेले पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही श्री मंदिरात प्रवेश करुन श्री विठ्ठलाचे थेट दर्शन न घेता मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेतले होते. मात्र आमदार ठाकूर यांनी मात्र धाराशिव जिल्ह्याची हद्दपार करुन सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. इतकेच नव्हे तर गर्दी करुन चैत्री एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली होती.

img-20200407-wa0011_copy_700x450

देशासह राज्यामध्ये संचारबंदी लागू आहे. श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन गेल्या 13 दिवसापासून भाविकासाठी बंद करण्यात आले आहे. असे असतानाही कोरोना साथीचा रोगाचा प्रादुर्भाव लक्षात न घेता भाजपचे आमदार सुजितसिंह मानसिंह ठाकूर (रा. धाराशिव) व त्यांच्या पत्नी  यांनी श्री विठ्ठलाची पूजा-अर्चा केली. श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर येथे एकत्र जमून कोरोना विषाणूचा संसर्ग फैलवण्याचा धोका आहे. याची जाणीव असतानासुद्धा श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजाअर्चा केली. म्हणून वरील सर्वांविरुद्ध भादवी कलम 269, 270, 188 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 (ब), व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (3), 135 तसेच साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 चे कलम 2, 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल बालाजी कदम यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

पूजेचा अट्टाहास नडला…
श्री रुक्मिणीमातेची पूजा केल्याप्रकरणी अजून एका मंदिर समिती सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या