२०० रुपयात सेटिंग करणारा वाहतूक पोलीस कॅमेऱ्यात कैद

25

सामना प्रतिनिधी । नागपूर

सिग्नल बंद असतानाही दुचाकी दामटताना पकडल्या गेलेल्याकडून २०० रुपयांची लाच घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. दुचाकीचालकाने २०० रुपये लाच देताना मित्राकरवी त्या पोलिसाचा व्हिडीओ तयार करून घेतला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. भुजंगराव थाटे असे त्या पोलीस हवालदाराचे नाव असून, तो वाहतूक शाखेच्या चेंबर ३ मध्ये कार्यरत होता.

गणराज्यदिनाचे औचित्य साधून शहरातील विविध भागातून रॅली निघतात. त्यात काही तरुण हुल्लडबाजी करतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते आणि सर्वसामान्य नागरिकांची नाहक कुचंबणा होते. शुक्रवारी गणराज्यदिनी शहरातील प्रत्येक चौकात, महत्त्वाच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त होता. सेंट्रल एव्हेन्यूवरील दोसर भवन चौकात थाटेंची नियुक्ती होती. त्यानंतर त्यांनी एका दुचाकीवर ट्रिपल सीट असलेल्या आणि सिग्नल बंद झाला असतानादेखील दुचाकी पुढे दामटणाऱ्या (सिग्नल तोडणाऱ्या) दुचाकीचालकाला अडवले. त्याला बाजूच्या तंबूत (पोलीस छावणी) नेले.

२०० रुपये कशासाठी?
हवालदार कारवाईचा धाक दाखवून ६०० रुपये मागितले. ती रक्कम आपल्याकडे नाही, असे दुचाकीचालकाने म्हटले असता थाटेने त्याला १२०० रुपये दंडाची चालान पावती बनविण्याचा धाक दाखवला.दुचाकीचालकाने येथेच निपटवून टाका, असे म्हटले असता त्याने ३०० रुपयांची लाच मागितली. दुचाकीचालकाने २०० रुपये समोर केले ते थाटेने पॅन्टच्या खिशात कोंबले. या संपूर्ण घटनाक्रम आणि संभाषणाचे दुचाकीचालकाचा साथीदार मोबाईलमध्ये छायाचित्रण करीत होता.

आपली प्रतिक्रिया द्या