तोंड बंद ठेवा! पोलीस कर्मचाऱ्याने ट्रम्प यांना सुनावले

1682

अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्युनंतर हिंसाचाराचा डोंब उसळला आहे. ठिकठिकाणी लुटालूट, जाळपोळ सुरू असून अनेक राज्यांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या दरम्यान, हिंसेवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याच्या ट्रम्प यांच्या टीकेवर एका पोलीस प्रमुखाने त्यांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील काही शहरांमध्ये हा हिंसाचार उफाळला आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या या हिंसाचाराची धग व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचली. परिस्थिती इतकी बिघडली की संरक्षणासाठी नेमलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षित बंकरमध्ये घेऊन गेले. सुदैवाने तिथे पोहोचलेल्या वॉशिंग्टन पोलिसांनी आंदोलकांना तिथून पिटाळून लावलं आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेतील राज्यांना नागरिकांना संरक्षण पुरवण्याचे आदेश दिले आहेत. जर कोणतंही राज्य किंवा शहर त्याच्या नागरिकांच्या आणि त्यांच्या संपत्तीच्या संरक्षणाला नकार देत असेल, तर तिथे मी अमेरिकन सैन्य उतरवून त्यांचं काम सोपं करेन, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

ट्रम्प यांच्या या विधानानंतर ह्युस्टनचे पोलीस प्रमुख आर्ट एक्वेडो यांनी ट्रम्प यांना तोंड बंद ठेवा, असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, मी देशाचा पोलीस प्रमुख या नात्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फक्त इतकं सांगू इच्छितो की, जर तुमच्याकडे चांगलं बोलण्यासाठी काहीही नसेल तर कृपया तुमचं तोंड बंदच ठेवा, अशा शब्दांत सुनावलं आहे.

अमेरिकेत पोलिसांकडून कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर होणारे अत्याचार नेहमीच तणावाचा विषय राहिले आहेत, आणि या घटनांविषयीची खदखद या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उफाळून आली आहे. या प्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. तर डेरेक शॉविन या 44 वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉविन यांना सोमवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे.

काय आहे हे प्रकरण
25 मे रोजी नकली नोटेचा वापर केल्या प्रकरणी कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्यात एक पोलीस कर्मचारी जवळपास सात मिनिटं जॉर्ज याच्या मानगुटीवर गुडघा ठेवून बसला होता, असं दिसत आहे. मला श्वास घ्यायला त्रास होत आहे, असं सांगूनही तो उठला नाही. श्वास गुदमरल्याने जॉर्ज बेशुद्ध पडला आणि नंतर मरण पावला. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली.

आपली प्रतिक्रिया द्या