मुलीला रेल्वेतून ढकलणाऱ्या तरुणाची ओळख पटली

84

सामना ऑनलाईन । कल्याण

जुईनगर स्थानकात तरुणीला धावत्या रेल्वेतून ढकलून तिची बॅग, मोबाईल आणि दागिने चोरुन नेणाऱ्या तरुणाची पोलिसांना ओळख पटली आहे. संतोष केकान असे त्या तरुणाचे नाव असून त्याच्या कल्याण येथील घरावर पोलिसांनी धाड टाकली. त्याच्या घरातून त्या मुलीची बॅग जप्त करण्यात आली, मात्र संतोष घरी नसल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही.

याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात संतोष मानसरोवर स्थानकातून ट्रेनमध्ये चढल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी मानसरोवर स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संतोष त्याच्या एका मित्रासह इनोव्हा गाडीने स्थानकात आल्याचे दिसले. तेथे त्यांनी सिगारेट ओढली व तो मित्र पुन्हा इनोव्हात बसून निघून गेला. पोलिसांना सीसीटीव्हीत त्या इनोव्हाचा नंबर दिसला व त्यावरुन पोलिसांनी संतोषच्या मित्राला ताब्यात घेतले. त्या मित्राने पोलिसांना संतोषच्या घरचा पत्ता दिला. त्यावरुन पोलिसांनी संतोषच्या गुरुवारी रात्री संतोषच्या घरावर धाड टाकली. संतोष घरी नसल्याने तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही पण पोलिसांना त्याच्या घरुन रितुजाची बॅग सापडली आहे. मात्र त्यातले रितुजाचे सोन्याचे कानातले व मोबाईल फोन गायब आहेत. पोलीस सध्या संतोषचा शोध घेत आहेत.

‘आम्ही धाड टाकली तेव्हा संतोष घरात नव्हता पण आता त्याची ओळख पटली आहे. त्यामुळे लवकरच त्याला आम्ही अटक करू. प्रथमदर्शी संतोषने दारुच्या नशेत हा गुन्हा केल्याचे दिसून येत आहे. पण त्याने ही चोरी का केली ते त्याला अटक केल्यानंतरच स्पष्ट होईल’, असे वाशीचे वरिष्ट पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले.

गेल्या शनिवारी ऋतुजा बोडके ही वडोदऱ्यातील मेडिकल कॉलेजची विद्यार्थीनी वडोदराहून वाशीला तिच्या घरी परतत होती. रात्री साडे अकराच्या सुमारास तिने पनवेलहून वाशीला जाणारी लोकल पकडली. त्या लोकलमध्ये ती एकटीच होती. त्यावेळी संतोष सीवुड्स स्थानकात रितूजा बसलेल्या महिलांच्या डब्ब्यात चढला व त्याने तिची सामानाची बॅग चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली व संतोषने ऋतुजाला जुईनगर स्थानकात धावत्या ट्रेनमधून ढकलून दिले. सुदैवाने ट्रेन स्थानकात प्रवेश करत असल्याने ऋतुजाला गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर तिने मागच्या ट्रेनने वाशी स्थानक गाठत पोलिसांत तक्रार नोंदविली.

आपली प्रतिक्रिया द्या