पत्नी आणि लेकीने पोलिसाची खलबत्त्याने ठेचून केली हत्या

मुलगी सासरी नांदत नसल्याने झालेल्या वादातून पत्नी व लेकीनेच पोलीस कर्मचाऱ्याची खलबत्त्याने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेत घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी माय लेकींना ताब्यात घेतले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कुटुंबीयांत आणखी कोणता वाद होता का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक येथील हिरा पन्ना अपार्टमेंट येथे प्रकाश बोरसे हे आपली पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री सोबत राहात होते. प्रकाश बोरसे हे मुंबई येथील कुर्ला पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबलपदी कार्यरत होते. सायंकाळी प्रकाश बोरसे ड्युटी संपवून घरी आले. त्यांचा पत्नी आणि मुलीसोबत वाद झाला. या वादातून दोघींनी खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यावर प्रहार करत त्यांना जखमी केले. या हल्ल्यात घाव वर्मी बसल्याने प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दोघी घराचा दरवाजा बंद करून घरात बसून होत्या. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. घरात प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले.

मृतदेहाशेजारी चार तास बसून

बोरसे यांच्या मृतदेहाशेजारी त्यांची पत्नी व मुलगी या दोघी चार तास बसून होत्या. पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. प्रकाश यांची मुलगी भाग्यश्री हिचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते, ती सासरी नांदत नसल्याने त्यांचा घरात कायम वाद होत असे. त्यातच प्रकाश बोरसे घरी आले असता त्यांचा याच विषयावरून पुन्हा वाद झाला. अखेर या वादातूनच पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांनी खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात प्रहार करून त्यांची हत्या केली.