कैद्यांना नेताना हळूच दोन शॉट मारले, 2 हवालदार निलंबित

29674

छत्तीसगडमधल्या बिलासपूर भागातील दोन पोलीस हवालदारांना निलंबित करण्यात आलं आहे.  कैद्याला तुरुंगातून न्यायालयात नेत असताना या हवालदारांनी एक छोटा ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये त्यांनी केलेली कृत्ये इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये चित्रीत केली होती. जी वरिष्ठांनी बघितल्यानंतर या हवालदारांना निलंबित करण्यात आले.

दिलीप वैष्णव आणि नानूराम डहेरिया अशी या हवालदारांची नावे आहेत. हे दोघेजण कुख्यात गुंडांना तुरुंगातून बेल्हा न्यायालयात नेत होते. या गुंडांवर महिलांची छेड काढणं, दरोडा आणि बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्र बाळगल्याचा आरोप आहे. या गुंडाना नेण्यासाठीच्या व्हॅनमध्ये एकूण 4 पोलीस कर्मचारी होते ज्यामध्ये वैष्णव आणि डहेरिया यांचाही समावेश होता.

न्यायालयात नेत असताना या दोन हवालदारांच्या डोक्यात दारू कुठे मिळेल याचाच विचार सुरु होता. त्यांनी रस्त्यात गाडी थांबवली आणि कडेला उभं राहून पटापट दारूचे शॉट मारले. यावेळी आरोपींसोबत व्हॅनमध्ये कोणीही नव्हतं. दारू पिऊन झाल्यानंतर या पोलिसांनी आरोपींना न्यायालयात नेलं आणि तिथून तुरुंगात परत आणलं. पोलीस व्हॅनमधील उर्वरीत दोन हवालदारांनी मात्र दारू प्यायली नाही. वैष्णव आणि डहेरिया यांची चौकशी झाली असून त्यात ते दोषी आढळले, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. हा प्रकार अत्यंत गंभीर होता कारण पोलीस व्हॅनमधील  कैदी पळून जाण्याची शक्यता होती. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून या हवालदारांना पोलीस अधीक्षकांनी तत्काळ निलंबित केलं.

 

आपली प्रतिक्रिया द्या