महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा खून

20

सामना प्रतिनिधी । पिंपरी

पिंपरीमध्ये निगडी पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदाराच्या मुलाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका टोळक्याने काठीने मारहाण करून हा खून केला आहे. अजिंक्य सुनील जैद (१९) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार समोर आला आहे. अजिंक्यची आई रंजना जैद या निगडी पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत.

मोहन नगर परिसरातील तरुणांनी अजिंक्य याला तो शिकत असलेल्या प्रतिभा कॉलेज येथून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यांनतर त्याला काठीने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अजिंक्य याला सायंकाळी सहाच्या सुमारास भोसरी, एमआयडीसी परिसरातील श्री. मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात सोडून मारेकरी पसार झाले. मात्र डॉक्टरांच्या तपासणीपूर्वीच अजिंक्यचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मारेकरी फरार असून पोलीस शोध घेत आहेत, खुनाचे कारण अद्याप समजले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या