पोलीस डायरी : न्यायालयातही दाऊदचे हस्तक!

503

येत्या नोव्हेंबरअखेरीस वयाच्या 65व्या वर्षी सेवानिवृत्त होणार असलेले सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन केसाबचंद्र गोगोई हे सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडले असून त्यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात ज्युनियर कोर्ट असिस्टंट म्हणून काम करणार्‍या पंचविशीतील एका विवाहित तरुणीने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. ज्युनियर असिस्टंट म्हणून ही तरुणी 2014 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयात काम करीत होती. गोगोई यांच्या कार्यालयात काम करणारा एक कोर्ट असिस्टंट काही दिवसांसाठी रजेवर गेल्यावर गोगोई यांनी या तरुणीला आपल्या कार्यालयात त्या (कोर्ट असिस्टंटच्या) जागेवर 2016 साली नेमले. त्या तरुणीच्या कामातील तत्परता, चातुर्य व काटेकोरपणा पाहून गोगोई यांनी तिला आपल्याकडेच कायम ठेवून घेतले व जुन्या कोर्ट असिस्टंटची अन्यत्र बदली केली. गोगोई यांच्या कार्यालयात याची धीरगंभीरपणे चर्चा सुरू झाली. जुन्या अनुभवी कोर्ट असिस्टंटच्या जागी एक ज्युनियर व अनुभव नसलेल्या महिलेची चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे न्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलेली नेमणूक `CJI’च्या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांना खटकली. ‘CJI’च्या कार्यालयातील स्टाफकडून व्यक्त करण्यात येत असलेल्या शंकांना अखेर दुजोरा मिळाला. केवळ दोन वर्षांत सरन्यायाधीश व त्यांची ज्युनियर कोर्ट असिस्टंट तरुणी यांच्यामध्ये खटके उडाले, वाद विकोपाला गेल्यानंतर त्या तरुणीला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. ती रस्त्यावर आली.

19 एप्रिल 2019 रोजी त्या तरुणीने सर्वोच्च न्यायालयातील 22 न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात तिने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणते, ‘सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालय विभागात 2014 साली ज्युनियर कोर्ट असिस्टंट म्हणून माझी निवड झाली. तेव्हा वरिष्ठांना कायद्याची पुस्तके व कागदपत्रे पुरविण्याचे माझे काम होते, परंतु 2016 साली CJI रंजन गोगोई यांचा कोर्ट असिस्टंट रजेवर गेल्याने गोगोई यांनी त्या कोर्ट असिस्टंटच्या जागेवर माझी नेमणूक केली. माझे काम आवडल्यानंतर तर त्यांनी मला त्यांच्या निवासस्थानातील कार्यालयात गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात नेमले. आपण आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस होणार आहोत. त्यामुळे मला अत्यंत विश्वासू, चाणाक्ष व चपळ अशा सहकार्‍याची गरज आहे. त्यात तू चपखल बसतेस असेही CJI गोगाई यांनी मला सांगितले, असेही ती आपल्या पत्रात म्हणते.

ती तरुणी पुढे म्हणते, तेव्हापासूनच माझा खडतर प्रवास सुरू होतो. आपल्या मुलीप्रमाणे मला मानणार्‍या CJI गोगोई यांनी एक दिवस आपल्या घरातील कार्यालयात माझ्या डोक्यावर हात ठेवला व ते (inappropriate manner) विचित्र वागू लागले. याचा मला प्रचंड मानसिक धक्का बसला. माझे सारे शरीर गोठून गेले. मी त्यांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने ते मागे हटले, सावध झाले. त्यांनी आपल्या दोन्ही हातांच्या मुठी आवळल्या. तेव्हापासून जो काही सूडाचा प्रवास सुरू झाला आहे तो काही अद्याप थांबलेला नाही.

गोगोई यांच्या निवासस्थानातील कार्यालयात काम करणारी ती तरुणी पुढे म्हणते, या प्रकाराची मी कुठेही वाच्यता केली नाही. अगदी दिल्ली पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल असलेल्या माझ्या पतीलाही सांगितले नाही. तरीही खोटी कारणे देऊन मला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मला, माझ्या पतीलाही खोट्या गुह्यात जेलमध्ये टाकले. त्यानंतर त्यांच्या भावावर (दीर) कारवाई झाली. आता आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच शिल्लक राहिलेले नाही. आम्ही बेघर झालो आहोत. त्यामुळेच अखेरचा पर्याय म्हणून मी सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांकडे न्याय मागत आहे. CJI गोगोई यांनी मी व माझ्या कुटुंबीयांवर केलेल्या अन्यायाची चौकशी करावी, अशी मी विनंती करीत आहे, असेही या तरुणीने आपल्या तक्रारीत शेवटी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील या माजी कर्मचारी महिलेचे लैंगिक शोषणाचे आरोप सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणतात, हे माझ्या विरुद्धचे षड्यंत्र आहे. अशा पद्धतीने न्यायपालिकेला जर लक्ष केले तर कुणी न्यायाधीश होणार नाहीत. या आरोप-प्रत्यारोपानंतर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. के. पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली फौजदारी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आहे. तर सरन्यायाधीश गोगोई यांना फसविण्याचे हे षड्यंत्र आहे असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाचे वकील उत्सव बैन्स यांनी केले आहे. त्याचीही निवृत्त न्यायाधीश पटनाईक हे चौकशी करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या आठवडय़ापासून दिल्लीमध्ये इनकॅमेरा चौकशी सुरू असून त्या महिलेची तक्रार खरी की खोटी का षड्यंत्र यावर लवकरच प्रकाश पडणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील उत्सव बैन्स यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात फारच गंभीर बाबी समोर आणल्या आहेत. ते म्हणतात, ‘रंजन गोगोई यांनी दिलेल्या विरुद्ध निकालामुळे बर्‍याच मोठय़ा उद्योगपतींचे नुकसान झाले आहे. अलीकडेच बंद पडलेल्या एका एअरलाइन्सच्या बाजूने निकाल फिरविण्यासाठी दाऊद इब्राहिमचा हस्तक रोमेश शर्मा याने बराच प्रयत्न केला, परंतु तो फसला. त्यामुळे चिडलेल्या दाऊदच्या हस्तकांनी गोगोईंना फसविण्यासाठी हे षड्यंत्र रचले आहे. गोगोईंनी राजीनामा दिल्यावर दाऊदच्या हस्तकांना हवा तसा निकाल आपल्या बाजूने मिळविता येईल. दिल्लीत cash for judgment fixers club आहे. त्या क्लबचा दाऊदचा हस्तक रोमेश शर्मा हा प्रमुख असून अलीकडे बंद पडलेल्या एअरलाइन्समध्ये दाऊद इब्राहिमची investment आहे. दाऊदचा पैसा बंद पडलेल्या एअर लाइन्समध्ये गुंतवल्यामुळेच गोगोईंना गुंतविण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे, असेही उत्सव बैन्स यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. हे प्रतिज्ञापत्र खरे असेल तर फारच भयानक आहे.

आता दाऊदचे लागेबांधे कुठे कुठे आहेत ते बघा. मुंबईतील ईस्ट ऍण्ड वेस्ट या एअरलाइन्समध्येही दाऊदची इन्व्हेस्टमेंट होती. परंतु या एअरलाइन्सचा चालक तक्कीऊद्दीन हा छोटा राजन टोळीकडून मुंबईत मारला गेल्यानंतर ही विमानसेवा बंद पडली. आता दाऊदने पैसा गुंतविलेली आणखी एक एअरलाइन्स नुकतीच बंद पडल्यामुळे सुमारे 22 हजार कर्मचारी रस्त्यावर आले आहेत. पाकिस्तानात बसून विमान व्यवसायात पैसा गुंतविणार्‍या दाऊदचे रोमेश शर्मासारखे king pin प्रत्येक न्यायालयात आहेत आणि ते हवा तसा निकाल आपल्या बाजूने लावून घेण्याचा प्रयत्न करतात. मग जो कुणी ऐकत नाही अशांची हे kingpin बदली करतात. गोगोई सरन्यायाधीश असल्यामुळे त्यांची या ‘किंगपिन’ना बदली करणे शक्य झाले नाही म्हणून असे षड्यंत्र रचले गेले आहे. आणि त्यात एक बलाढ्य उद्योगपती आहे, असाही दावा वकील उत्सव बैन्स यांनी केला ओह. आता बोला, न्यायव्यवस्थेवरच जर शंका व्यक्त केली जात असेल तर विश्वास कुणावर ठेवावा!

आपली प्रतिक्रिया द्या