शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी झाली. लोक नऊ दिवस दुर्गोत्सव आनंदात साजरा करतात. रत्नागिरी जिह्याच्या राजापूर तालुक्यातील आजिवली गावची वैष्णवी प्रकाश माने (वय वर्षे 16) ही सरस्वती विद्यामंदिर (पाचल) शाळेत शिकणारी (अकरावी-सायन्स) मुलगी सरस्वती पूजनाच्या दिवशी शाळेत गरबा खेळायला, गाणी गायला मिळणार, वक्तृत्व कलेला संधी मिळणार म्हणून खूश होती.
गुरुवार, 10 ऑक्टोबर रोजी वैष्णवी सकाळी लवकर उठली व आपल्या घरापासून चार-पाच कि.मी. दूर असलेल्या शाळेत पोहोचली. क्लासचे सकाळचे सत्र दुपारी दीड वाजता संपले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात शाळाचालकांनी कोणतेही छप्पर अथवा सावली नसताना अत्यंत कडक उन्हात दुपारी 2 वाजता मुलांचे गरबा नृत्य सुरू केले. सनस्ट्रोक व्हावा असे तापमान होते. त्या कडक उन्हात माणूस जास्त वेळ थांबला तर तो कोमातच जाणार! त्याची प्रचीती क्षणात आली. गरबा खेळणाऱ्या व प्रकृती ठणठणीत निरोगी असलेल्या वैष्णवीला कडक उन्हाचा त्रास सुरू झाला. कर्णकर्कश ‘डीजे’च्या आवाजाने तर तिच्या कानठळय़ा बसल्या. चक्कर येऊन ती खाली पडली. तरीही ‘डीजे’चा मोठा आवाज सुरूच होता. त्या वेळी शाळेतील 40 ते 45 कर्मचारी शाळेच्या हॉल व केबिनमध्ये बसून गाण्याचा आनंद घेत होते; परंतु कडक उन्हात बेशुद्ध होऊन पडलेल्या आपल्या विद्यार्थिनीला उपचारासाठी लगबग करावी, तिला डॉक्टरकडे न्यावे असे कुणालाच वाटले नाही. मुलीला चक्कर आलेली आहे. ती शुद्धीवर आल्यावर कार्यक्रमात भाग घेईल, असा समज झालेल्या शाळाचालकांनी वैष्णवीवर पाऊण तास कोणतेही उपचार केले नाहीत. शाळेच्या बाजूला असलेल्या खासगी डॉक्टरकडेही नेले नाही. ‘गोल्डन अवर’मध्ये (एक तासाच्या आत) वैष्णवीला वैद्यकीय उपचाराची, प्राणवायूची गरज होती; परंतु शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी भरउन्हात नृत्य करताना खाली कोसळलेल्या आपल्या विद्यार्थिनीकडे दुर्लक्ष केले.
वैष्णवीची हालचाल व श्वासही मंद झाला तेव्हा तिला तासाभराने राजापुरातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तेथेही उपचार सुरू करण्यात दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे वैष्णवीचा मृत्यू झाला, अशी लेखी तक्रार वैष्णवीचे वडील प्रकाश लक्ष्मण माने यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे केली आहे. त्या तक्रारीत ते पुढे म्हणतात, माझ्या मुलीच्या मृत्यूस सरस्वती विद्यामंदिर (पाचल) शाळेचे मुख्याध्यापक, व्यवस्थापक तसेच रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हे जबाबदार असून याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रकाश माने यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे.
प्रकाश माने म्हणतात, माझी मुलगी वैष्णवी ही लहानपणापासून अभ्यासात हुशार होती. शालान्त परीक्षेत ती प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. ती फारच ‘क्रिएटिव्ह’ होती. अत्यंत कणखर व सशक्त होती. तिला कोणताही आजार नव्हता. तिला यूपीएससी परीक्षेला बसून आयएएस अधिकारी व्हायचे होते. अशा या अत्यंत Outstanding मुलीचा शाळेनेच बळी घेतला, असाही माने यांनी आरोप केला आहे.
भरउन्हात कार्यक्रम आयोजित करून शाळाचालक व मुख्याध्यापकांनी वैष्णवीच्या मृत्यूला आमंत्रण दिले. उष्माघातामुळे शरीरातील क्षार व पाण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळेच वैष्णवीला आपले प्राण गमवावे लागले. शाळाचालकांचा, मुख्याध्यापकांचा, शिक्षकांचा हलगर्जीपणा वैष्णवीच्या मुळावर आला, असा दुर्दैवी प्रकार पुन्हा कुठल्या शाळा-कॉलेजात घडू नये. त्यांच्या बेजबाबदार वागण्याला चाप बसावा म्हणून सरस्वती शाळेच्या चालक व मुख्याध्यापकांवर कारवाई व्हावी, अशीही मागणी प्रकाश माने यांनी केली आहे.
या जमान्यात बहुसंख्य शाळाचालक-मालक, व्यवस्थापक, शिक्षक यांच्या संवेदनाच गेल्या आहेत. नाहीतर बदलापूर शाळेत चिमुरडय़ा मुलींवरील लैंगिक अत्याचाराची घटना घडलीच नसती. शाळाचालकांच्या अनागोंदी कारभारामुळेच अक्षय शिंदे या नराधमाने मुलींचे लैंगिक शोषण केले. पालकांनी आपल्या मुलांना शाळाचालकांच्या भरवशावर शाळेत पाठवायचे त्याच शाळाचालकांनी बेजबाबदारपणे वागायचे, मुलांचा घात करायचा असे प्रकार अलीकडे वाढू लागले आहेत. विद्यार्थ्यांची, लहान मुलांची आपुलकीने काळजी घेणारे चारित्र्यसंपन्न शिक्षक अलीकडे शोधावे लागत आहेत, ही आजच्या समाजाची शोकांतिका आहे. जीवघेण्या कडक उन्हात सरस्वती विद्यामंदिरच्या संस्थाचालकांनी व शिक्षकांनी गरबा नृत्याचे आयोजन करून एका निष्पाप अल्पवयीन मुलीचा दुर्गामातेला बळी तर दिला नाही ना? असाही सवाल करण्यात येत आहे. दसरा-दिवाळी सण सुरू असतानाच माने कुटुंबीयांच्या घरात काळाकुट्ट अंधार पसरविणाऱया संबंधितांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जगभरात नाव असलेल्या मुंबई क्राईम ब्रँच व एटीएसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एक प्रामाणिक व सचोटीचा अधिकारी अशी त्यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिमा आहे. ते नक्कीच माने कुटुंबीयांना न्याय देतील, अशी आजिवलीचे ग्रामस्थ अपेक्षा करीत आहेत.