हैदराबादचा ‘सुपर कॉप’

1306

<<प्रभाकर पवार>>

लहान मुलापासून ते अगदी वृद्धापर्यंत रोजच कुणी ना कुणी मृत्युमुखी पडतच असतो. महिलांवर अत्याचार होतच असतात; परंतु हैदराबादमधील पशुवैद्यक डॉक्टर प्रियंका रेड्डी या 25 वर्षीय तरुणीला ज्या पद्धतीने बलात्कार करून ठार मारण्यात आले ते ऐकून व बघून कुणाच्याही धमन्या तापल्याशिवाय, मनाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या सायबराबाद शहराचे पोलीस आयुक्त विश्वनाथ सज्जनार हे तरी त्यास अपवाद कसे असतील? भले ते खाकी वर्दीत असले तरी तेही माणूसच आहेत, त्यांनाही भावना आहेत. आधीच देशभरातील वाढत्या बलात्कार मालिकांचे सत्र पाहून त्यांचे मन बधिर झाले होते. त्यात प्रियंकाला 7 तास डांबून व बांधून ठेवून तिच्यावर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला.

त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळून ठार मारले. या वृत्ताने सज्जनार यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्या सहकाऱयांनी घटना घडल्यानंतर केवळ 24 तासांत आरोपींना अटक केली. तपासासाठी बाहेर काढले व ज्या ठिकाणी प्रियंकाला आरोपींनी पेट्रोल ओतून जाळले होते त्याच ठिकाणी त्यांना पोलीस आयुक्त सज्जनार व त्यांच्या सहकाऱयांनी चकमकीत ठार मारून प्रियंकाला न्याय मिळवून दिला व ‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ या पोलिसी ब्रिदवाक्याची बूज राखली. त्यामुळे देशभरातून सज्जनार व त्यांच्या सहकाऱयांचे कौतुक केले जात आहे, तर सज्जनारसारख्या कर्तव्यकठोर वीरपुरुषाच्या या झटपट न्याय देण्याच्या शौर्यशाली कार्यपद्धतीवर समाजाच्या ठेकेदारांनी व कायद्याचा कीस काढणाऱया बुद्धिवंतांनी टीका केली आहे. त्यामुळे सज्जनार व त्यांच्या सहकाऱयांच्या अडचणी येथून पुढे वाढणार असून चकमकीत भाग घेणाऱया अधिकारी व कर्मचाऱयांना उद्या जेलमध्ये जावे लागले तर कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये.

आपला देश लोकशाहीप्रधान असल्यामुळे पोलिसांची ही कारवाई असंविधानिक असल्याचे बुद्धिजीवींकडून बोलले जात आहे, तर हैदराबादचे पोलीस म्हणतात, आमची चकमक खरी आहे. आमच्यावर हल्ला झाला म्हणूनच आम्ही स्वरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात शिवा, नवीन, चेन्नकेशवुलू व महम्मद आरीफ हे चार आरोपी ठार झाले. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न असा (307 अन्वये) गुन्हा दाखल केल्याचेही चकमकीत भाग घेणाऱया अधिकाऱयांनी सांगितले. हे सारे कोर्टात किती टिकेल हे महत्त्वाचे आहे; परंतु पोलिसांनी केलेली कारवाई रास्त आहे. त्यामुळे त्यांचाच विजय होईल, अशी अपेक्षा सारी हिंदुस्थानी जनता करीत आहे.

27 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास रस्त्यात स्कूटर पंक्चर झाली म्हणून पुढे आलेल्या चार जणांची मदत घेण्याचा डॉ. प्रियंकाने प्रयत्न केला, परंतु त्यांनीच विश्वासघात केला. एका ट्रकचालकासह चार जणांनी डॉ. प्रियंका हिला 7 तास बांधून आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला व आपल्या विरुद्ध पोलिसांत तक्रार करू नये म्हणून तिला जाळून ठार मारले. अशा क्रूरकर्म्या आरोपींना पोलीस आयुक्त सज्जनार व त्यांच्या सहकाऱयांनी 6 डिसेंबर रोजी चकमकीत ठार मारले. परंतु त्याआधीही सज्जनार या सुपर कॉपने दोन विद्यार्थिनींवर एकतर्फी प्रेमातून ऍसिड हल्ला करणाऱया तीन आरोपींना व एका नक्षलवाद्याला चकमकीत ठार मारले होते. अशा या जनतेमध्ये लोकप्रिय असलेल्या अनुभवी धडाडीच्या अधिकाऱयाविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावणाऱया प्रवृत्तींविरुद्ध देशभरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बलात्कार करून खून करणाऱया नराधमांना फाशीची शिक्षा दिली जाते; परंतु त्याची वर्षानुवर्षे अंमलबजावणी होत नाही. न्यायालयाला उन्हाळी, हिवाळी, ख्रिसमस आदी बऱयाच वार्षिक सुट्टय़ा असतात. त्यामुळे वर्षातून 150 दिवसही न्यायालयाचे काम होत नाही. त्यामुळे खटलेही प्रलंबित राहातात म्हणून ‘रेपिस्ट’ना चकमकीत ठार मारण्याची कार्यपद्धती हैदराबाद पोलिसांनी सुरू केली. याचे देशभरातून स्वागत होत आहे.

अर्थात म्हणून काही महिला व लहान मुलांवरील अत्याचाराचे, बलात्काराचे गुन्हे येथून पुढे थांबतील असे सुतराम वाटत नाही. कारण ही एक विकृती आहे. या विकृतीवर औषधच नाही. ज्यांच्या शरीरात नकारात्मक ग्रंथी आहेत अशा माणसांकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? वास्तविक मानव ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. त्याच्याकडे अफाट बुद्धी व सामर्थ्य आहे. सर्व जीवित प्राण्यांमध्ये मनुष्यालाच विचार करण्याची देवाने शक्ती दिली आहे; परंतु मानव म्हणजे एक अजब रसायन आहे. कुणाला सदसद् विवेकबुद्धीची जाण असते तर कुणाला नसते. नीती-अनीती, न्याय-अन्याय, बरे-वाईट याच्याशी कोणतेही सोयरसुतक नसलेला हा दुर्गुणी माणूस कामातूर झाला की तो कोणत्याही थराला जातो. अगदी पवित्र बंधनेही तोडतो. त्याला फक्त नर आणि मादी ही दोनच नाती दिसतात. तो राक्षसी पद्धतीने वागतो. जर कायदे नसते, शासन यंत्रणा नसती तर हा मनुष्यप्राणी दानवापेक्षाही अत्याचारी बनला असता हे लक्षात ठेवा. आज मिनिटागणिक लहान मुलांना, महिलांना लक्ष्य केले जात आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत, जाळले जात आहे. याला कामातूर माणसाचा क्रोधही कारणीभूत आहे. आपल्याला पाहिजे ती वस्तू (बाई) मिळाली नाही की एकतर्फी प्रेमातून फेका तिच्या अंगावर ऍसिड, जाळा तिला रस्त्यात! बरेच जण आज यू टय़ूब, व्हॉट्सऍप आदी सोशल मीडियातून व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ व ऑडिओ क्लिपमुळे बिघडत आहेत. अश्लील व्हिडीओ क्लिप (पॉर्न) बघून बुद्धी भ्रष्ट झालेले जवळचेच लोक लहान मुलांना टार्गेट करीत आहेत. आज देशभरात रेकॉर्डवर आलेले, पोक्सोचे (Protection of Children from Sexual Offences) सुमारे 2 लाख खटले प्रलंबित आहेत.

न्यायालयात लवकर न्याय मिळत नाही. महिलांचे, लहान बालकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱया विकृतांना सजा होत नाही. म्हणूनच ‘एन्काऊंटर’चा मार्ग जर हैदराबाद पोलिसांनी अवलंबिला असेल तर त्यांच्यावर तुम्ही Licence to Kill चा आरोप कसा काय करू शकता? ज्यांच्या घरात मुली आहेत ते नक्कीच करणार नाहीत. आरोपींना पकडून जेलमध्ये टाकायचे, त्यांना सरकारी खर्चातून वर्षांनुवर्षे पोसायचे हे कुठवर चालणार आहे?

मुंबई पोलीस व क्राइम ब्रँचच्या अधिकाऱयांनी जर अंडरवर्ल्डचे कंबरडे मोडले नसते, चकमकी सुरू केल्या नसत्या तर लोकांना जगणे मुश्किल झाले असते. मुंबईचा बिहार, पाटणा झाला असता. संघटित टोळय़ांच्या गुंडांनी गेल्या 25 वर्षांत एक हजाराच्या वर व्यक्तींना गोळय़ा घालून ठार मारले होते. मुंबई पोलिसांमध्ये सज्जनारसारखे ‘सुपर कॉप’ होते म्हणूनच गुंडांच्या गोळीबाराला मुंबई पोलिसांनी एन्काऊंटरने जशास तसे उत्तर दिले. त्यामुळेच मुंबईत शांतता निर्माण झाली. मुंबई क्राइम ब्रँचच्या चकमकीत 800 च्या वर गुंड मारले गेले. तेव्हा जनहो, काळ सोकावतो, पाप वाढतात तेव्हाच सज्जनारसारखे पराक्रमी अधिकारी परिणामांची पर्वा न करता मैदानात उतरतात आणि शिवशंकराचे रूप धारण करून मानवरूपी भस्मासुराचा वध करतात. त्याचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे. सज्जनार हे खरे सुपर कॉप आहेत!

ता.क. – प्रियंका रेड्डीच्या हत्येमागे गोमांस निर्यात करणारी लॉबी असल्याचेही सांगण्यात येते. प्रियंका ही गोवंश हत्येच्या विरोधात होती. त्यामुळेच कटकारस्थान करून अतिशय सुंदर दिसणाऱया प्रियंकाला हाल हाल करून मारण्यात आल्याचे सांगण्यात येते. याचीही सखोल चौकशी करण्याचे आदेश तेलंगणा सरकारने द्यावेत.

आपली प्रतिक्रिया द्या