पोलीस डायरी; खोटारडा पाकिस्तान

1107

प्रभाकर पवार << [email protected] >>

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर 2000 साली बँकॉक येथे हल्ला करणाऱया दाऊद टोळीतील मोहम्मद हुसेन सय्यद ऊर्फ मुन्ना झिंगाडा यास बँकॉक न्यायालयाने पाकिस्तानच्या ताब्यात द्यावा. तो पाकिस्तानचा नागरिक आहे, असा आदेश नुकताच दिला असून या आदेशाचा हिंदुस्थान सरकारला व मुंबई पोलिसांना धक्का बसला आहे.

झिंगाडा हा हिंदुस्थानी असून तो मुंबईतील जोगेश्वरी भागात राहणारा आहे. छोटा शकीलसाठी काम करणाऱया या गुंडाविरुद्ध मुंबई पोलीस दप्तरी बऱयाच गंभीर गुह्यांच्या नोंदी आहेत. मुंबई पोलिसांना वॉण्टेड असलेल्या या खतरनाक गुंडाने 15 सप्टेंबर 2000 रोजी छोटा राजनचा शोध घेऊन तो राहात असलेल्या बँकॉक येथील घरात घुसून अंधाधुंद गोळीबार केला. त्यात छोटा राजन गंभीर जखमी झाला. तर रोहित वर्मा हा छोटा राजनचा साथीदार जागीच ठार झाला. यावेळी मुन्ना झिंगाडा यास तेथील सुरक्षा रक्षकांनी स्टेनगनसह अटक केली, तर छोटा राजन जखमी अवस्थेत पळून जाण्यात यशस्वी झाला. आज या घटनेला 18 वर्षे लोटून गेली आहेत. मुन्ना झिंगाडा आजही बँकॉक येथील जेलमध्ये आहे. त्याला आपल्या ताब्यात द्या, म्हणून आपले हिंदुस्थान सरकार आटोकाट प्रयत्न करीत आहे. मुंबई क्राइम ब्रँचचे तत्कालीन पोलीस उपायुक्त (आता अतिरिक्त पोलीस आयुक्त) दिलीप सावंत यांनी अनेकदा धोका पत्करून बँकॉकला वास्तव्य केले. ट्रायल कोर्टात मुन्ना झिंगाडा आमचाच आरोपी व हिंदुस्थानी नागरिक असल्याचे शाळेच्या दाखल्यासह पुरावे दाखल केले. ट्रायल कोर्टाने ते मान्यही केले. पाकिस्तानने या निर्णयाविरुद्ध बँकॉकच्या सुप्रीम कोर्टात अपील केले व मुन्ना झिंगाडा आमचाच नागरिक असल्याचे खोटे पुरावे सादर करून ट्रायल कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरविला; परंतु हिंदुस्थान सरकारने न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध थायलंड सरकारकडे धाव घेतली आहे. त्यामुळे मुन्ना झिंगाडा याच्या सुटकेला तूर्त स्थगिती मिळाली आहे.

पाकिस्तानच्या बाजूने निर्णय देण्यापूर्वी बँकॉकच्या सुप्रीम कोर्टाने जर एखादी समिती नेमली असती व हिंदुस्थान – पाकिस्तान या देशांनी सादर केलेल्या कागदपत्रांची खातरजमा केली असती तर चित्र स्पष्ट झाले असते, परंतु पाकिस्तानने साऱयाच यंत्रणा मॅनेज केल्यावर होणार काय? मूळचा झिंगाडा हा जोगेश्वरी पूर्व येथे राहात होता. त्याच्या घराजवळच्या स्वामी विवेकानंद शाळेत त्याने प्राथमिक शिक्षण घेतले होते. तसेच इस्माईल युसूफ या जोगेश्वरीच्याच कॉलेजमध्ये त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पार पडले होते. त्याच्या इम्रान या भावाला मुंबई पोलिसांनी चकमकीत ठार मारले तर मुन्ना झिंगाडा बचावला व त्याने पाकिस्तान गाठले. त्याची आई, दोन बहिणी व एक भाऊ आजही जोगेश्वरी येथेच राहातात. त्याचे सारे पुरावे मुंबई क्राइम ब्रँचने बँकॉकच्या न्यायालयात सादर करूनही न्यायालयाने पाकिस्तानने सादर केलेली खोटी कागदपत्रे ग्राह्य धरून मूळचा झिंगाडा पाकिस्तानी असल्याचे शाबीत केले. हे अनाकलनीय आहे.

झिंगाडा हा छोटा शकीलचा आघाडीचा साथीदार आहे. त्याला दाऊद, अनीस इब्राहिम व त्यांच्या कुटुंबीयांच्या वास्तव्याची व मुंबईतील दाऊद टोळीतील हस्तकांची इत्थंभूत माहिती आहे. मुन्ना झिंगाडा यास मुंबई क्राइम ब्रँचच्या ताब्यात दिल्यास दाऊद टोळीच्या पाकिस्तानातील कार्यपद्धतीवर प्रकाश पडेल व त्याचा फायदा हिंदुस्थानला होईल. पाकिस्तानही अडचणीत येईल. या सर्व बाबी लक्षात घेऊन त्यांच्या नसलेल्या मुन्ना झिंगाडा या नागरिकाला पाकिस्तानने आपला नागरिक असल्याचे खोटी कागदपत्रे तयार करून निकाल आपल्या बाजूने लावून घेतला आहे. त्यासाठी त्यांनी बँकॉकमधील सर्व यंत्रणा पोखरल्या. काही करून मुन्ना झिंगाडाला हिंदुस्थानच्या ताब्यात द्यायचाच नाही असा ‘पण’ त्यांनी केला आहे.

पाकिस्तानच्या खोटारडेपणाची ही हद्द झाली. हिंदुस्थानला जागतिक पातळीवर अडचणीत आणण्यासाठी याच पाकिस्तानने कुलभूषण जाधव या आपल्या मुंबईकर माजी नौदल अधिकाऱयाचे बलुचिस्तानातून अपहरण करून त्यास ‘रॉ’ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक ठरविले आणि पाकिस्तानातील जेलमध्ये टाकले. पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यास फाशीची शिक्षाही ठोठावली आहे. परंतु त्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थगिती आहे. त्यामुळे पाकिस्तान हिंदुस्थानला अडचणीत आणण्यासाठी, हिंदुस्थानची बदनामी करण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी आज कोणत्या थराला जाईल याची शाश्वती नाही. पाकिस्तान हा या भूतलावरील सगळय़ात खोटारडा देश आहे. दहशतवाद पोसून, अतिरेक्यांचे कारखाने उघडून या देशाने साऱया जगाला त्रस्त केले आहे. त्याच देशात दाऊद व त्याचे 200 च्या वर हिंदुस्थानी हस्तक आज पाकिस्तानात खुलेआम वावरत आहेत. मुंबईतील अंडरवर्ल्डमध्ये आजही दाऊद टोळीचाच वरचष्मा आहे. दाऊदच्या नावाचा आजही रियल इस्टेटमध्ये व फिल्म इंडस्ट्रीमध्ये दबदबा आहे. त्यामुळे अंडरवर्ल्ड व अतिरेक्यांचे आश्रयस्थान असलेल्या संपूर्ण पाकिस्तानचा आता ‘बालाकोट’ करायलाच पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या