पोलीस डायरी – ..त्यांनी काय पाप केले आहे?

>> प्रभाकर पवार

मुंबईच्या शाहू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे 32 वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल हनुमंत कुलकर्णी यांचे 16 मे रोजी त्यांच्या राहत्या घरी पहाटेच्या सुमारास बाथरूममध्ये पडून निधन झाले. अमोल कुलकर्णी यांना मृत्यूपूर्वी 4 दिवस अगोदर ताप येत होता. तेव्हा त्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली. रिपोर्ट येईपर्यंत कुलकर्णी यांनी घरीच उपचार सुरू केले होते. परंतु मधूमेह व रक्तदाबाचा त्रास असणाऱया कुलकर्णी यांचा आजार बळावला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कुलकर्णी हे आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत हे बघण्यासाठी या जगात राहिले नाही. कारण कुलकर्णी शहीद झाल्यानंतरच दोन दिवसांनी कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त झाला. मुंबईसह महाराष्ट्रातील आतापर्यंत 11 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यात कुलकर्णी हे पहिलेच पोलीस अधिकारी आहेत. कुलकर्णी हे मुंबई पोलीस दलातील डॅशिंग अधिकारी होते. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 1200 जणांचा बळी गेला आहे. त्यात पन्नास व साठीतील व्यक्तीचा भरणा अधिक आहे. परंतु इतक्या कमी वयाचे (32) कुलकर्णी हे पहिलेच तरुण आहेत. महाराष्ट्रातील 96 अधिकाऱ्यांसह 1300 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सारे पोलीस पुन्हा एकदा भयभीत झाले आहेत. स्वत:चा बचाव करण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले आहे.

ज्या ज्या ठिकाणी मनुष्य प्राणी आहे त्या त्या ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला आहे. अगदी जेलही त्यास अपवाद नाहीत. सध्या महाराष्ट्रातील बऱयाच कारागृहांत कोरोनाबाधीत कैदी आहेत. त्यामुळे शासनाने कैद्यांना जामीन व पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 60 कारागृहे आहेत. परंतु ती अपुरी आहेत. त्यामुळे प्रत्येक कारागृहात दुप्पट-तिप्पट कैद्यांना कोंबण्यात येते. हे वर्षानुवर्षे सुरू आहे. कैदी कारागृहात दाटीवाटीने राहत असल्यामुळे बऱयाच कैद्यांना त्वचारोगही असतात. त्यामुळे कोरोनाचा जेलमध्ये अलीकडे प्रसार वाढला आहे. मुंबईतील आर्थर रोड जेलमधील अधिकारी व कर्मचाऱयांनी कोरोनाच्या प्रार्दुभावाचा धसका घेतला आहे. कैदी पूर्णपणे वैफल्यठास्त झालेले आहेत. यामुळे राज्य शासनाने सुमारे 18,000 कैद्यांना जामीन व पॅरोलवर सोडण्याचा (काही अटी घालून) निर्णय घेतला आहे. या कच्च्या कैद्यांमध्ये चोर, लफंगे, गर्दुल्ले, जीवे ठार मारण्याची धमकी देणारे, हिंसक कारवाया करणारे आदी गुन्हेगार आहेत. उद्या हे सारे लॉक डाऊन संपल्यावर पुन्हा जेलमध्ये कैदी परततील याची पूर्ण खात्री देता येत नाही. त्यामुळे कैद्यांना शोधण्याचे पोलिसांना भविष्यात काम वाढणार आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेतला. मग छोटा राजन टोळीतील खतरनाक गुंड लखन भैया चकमकीमध्ये अडकलेल्या (गेल्या 10 वर्षांपासून मुंबई पोलीस दलातील शिक्षा भोगत असलेल्या) 14 पोलीस अधिकारी व शिपायांचे काय? त्यांनी अधिकचे काय पाप केले आहे? आतापर्यंत या 14 पोलिसांनी एकत्रितपणे 140 वर्षे सजा भोगली आहे. तेव्हा आणखी किती त्यांचा अंत बघणार? किती वर्षे त्यांना नरकात ठेवणार?

छोटा राजन टोळीतील खतरनाक गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया यास 2006 साली मुंबई पोलिसांनी वर्सोवा येथे चकमकीत ठार मारले; परंतु ही चकमक खोटी ठरवून न्यायालयाने 14 पोलीस अधिकारी व शिपाई यांच्यासह 22 जणांवर कारवाई करण्याचे आदेश विशेष पथकाला दिले. मुंबई क्राइम ब्रँचचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रसन्ना यांनी 22 जणांवर कारवाई केली. त्यातील एक चकमकफेम पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जाधववार यांनी निर्दोष सोडले, तर 21 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा भोगून आज 10 वर्षे लोटली आहेत. पोलीस निरीक्षक अरविंद सरवणकर या अधिकाऱयाचे जेलमध्येच निधन झाले, तर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, दिलीप पालांडे, नितीन सरतापे, उपनिरीक्षक गणेश हारपुडे, आनंद पालांडे या अधिकाऱयांसह पोलीस शिपाई तानाजी देसाई, पांडुरंग कोकम, संदीप सरदार या पोलीस शिपायांसह (6 खासगी व्यक्ती) 18 जण ठाणे, पैठण, अमरावती, येरवडा, कोल्हापूर, तळोजा आदी कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

जे पोलीस सध्या लखन भैया चकमकप्रकरणी सजा भोगत आहेत त्यांचा या चकमकीशी व्यक्तिश: काहीही संबंध नव्हता. त्यांना कागदोपत्री गुंतविण्यात आले आहे. एका गुंडाला एकाच वेळी दोन डझन पोलीस चकमकीत ठार मारण्यासाठी एकत्र येऊ शकतात का? परंतु आज सामान्यांना कोणी वाली नाही. त्याचेच भोग या पोलिसांना भोगावे लागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारो कैद्यांना जामिनावर व पॅरोलवर सोडण्यात येत आहे. मग आमच्या या 14 पोलिसांची जामिनावर तरी सुटका करा आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहण्याची संधी द्या, अशी अपेक्षा करण्यात येत आहे. चोर-लफंग्यांना तुम्ही सोडता, मग कर्तव्य बजावणाऱया पोलिसांवर अन्याय का? गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याचा गांभीर्याने विचार करावा.

आपली प्रतिक्रिया द्या