पोलीस डायरी – …तर पोलीस बंड करतील!

482

>> प्रभाकर पवार

दिल्लीमधील तीस हजारी कोर्टात शनिवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी कायद्याचे रक्षक पोलीस व वकिलांमध्ये झालेला राडा ज्यांनी पाहिला त्यांचा या दोन्ही प्रवृत्ती व प्रकृतींवरील विश्वास उडाला आहे. गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना खाकी वर्दीतील माफिया म्हणतात. आता दिल्लीतील साकेत कोर्टातील वकिलांचा धुडगूस पाहिल्यावर हे कायद्याचे रक्षक नव्हेत तर भक्षक आहेत असे वाटते. निमित्त कोणतेही असो, परंतु ज्यांना कायदा माहीत आहे, परिणाम माहीत आहेत त्या काळ्या कोटातील दिल्लीतील वकिलांनी पोलिसांना बेशुद्ध होईपर्यंत मारावे, पोलीस चौकीला आग लावावी, कागदपत्रे फाडावीत, जाळावीत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करावे. हे कोणत्या आयपीसी सेक्शनमध्ये बसते? तीस हजारी कोर्टात एका वकिलाला आपली स्कूटर पार्क करावयास दिली नाही म्हणून झालेल्या वादातून पोलीस व वकिलांमध्ये दंगल उसळली. त्यात पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात मार खाल्ला. 20च्या वर पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. जखमीमध्ये मोनिका भारद्वाज या पोलीस उपायुक्त महिलेचाही समावेश आहे, तर अर्ध्या डझनच्या वर वकीलही पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस व वकील यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्लीमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. तीस हजारी कोर्टातील वकिलांना गाडय़ा पार्क करण्यास जागा नसते. म्हणून सरकारने वकिलांच्या मागणीवरून कोर्टाजवळच मेट्रो स्टेशन उभारले आहे. तरीही वकिलांनी कोर्टात गाडय़ा आणणे व त्या अनधिकृतपणे पार्क करणे बंद केले नाही. त्यामुळे पोलीस सुरक्षेचे कारण पुढे करून वकिलांना रोज हटकतात. त्याचाच 2 नोव्हेंबर रोजी स्फोट झाला आणि वकिलांनी पोलिसांवर हल्ले केले. पोलीस चौकी जाळली. याचा दिल्ली पोलिसांनी प्रचंड धसका घेतला असून त्यांच्या कुटुंबीयांनी रस्त्यावर उतरून या साऱ्या प्रकाराचा निषेध केला आहे. आम्ही असुरक्षित आहोत. आता आम्हाला संरक्षण द्या, अशी मागणी पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. आमच्यावरील हल्ले हे human rights मानवाधिकारामध्ये मोडत नाहीत का, असाही सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात देशभरात पोलिसांनी बंड केले तर त्याचे कुणी आश्चर्य वाटून घेऊ नये. कुणाचेही नेतृत्व व युनियन नसताना महाराष्ट्रात 1981 साली पोलिसांनी उठाव केला होता. सरकारने तो मोडून काढला. परंतु अलीकडे पोलिसांवरील वाढते हल्ले, निलंबन व सरकारचा नसलेला पाठिंबा पाहता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणारे पोलीस कधी ना कधी रस्त्यावर येतील हे लक्षात ठेवा

तीस हजारी कोर्टातील वकिलांचा पोलिसांवर हल्ला करण्याचा, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा इतिहास तसा जुनाच आहे. रेमन मॅगेसेसे पुरस्कार विजेत्या डॉ. किरण बेदी या अधिकारी (आयपीएस) महिलेला हजारी कोर्टातील वकिलांनी 30 वर्षांपूर्वी संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या खमक्या व प्रवाहाविरुद्ध लढणाऱ्या अधिकारी असल्यामुळे त्या त्यांना पुरून उरल्या. परंतु त्यांच्या आयपीएस सेवेतील हजारी वकिलांविरुद्धचा लढा सर्वात संघर्षमय ठरला आहे, असे किरण बेदी आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात म्हणतात. जर माझ्या संरक्षकांनी माझ्याभोवती कडे केले नसते तर गुंड प्रवृत्तीच्या तीस हजारी वकिलांनी माझ्यावर हल्ला केला असता. तरीही त्यांनी पोलिसांच्या छातीवरचे त्यांच्या नावाचे बिल्ले हिसकावून फेकून दिले. डोक्यावरच्या टोप्या उडविल्या. माझेही डोके ते उडविणार होते. परंतु मी लाठीहल्ला करण्याचे आदेश दिल्यामुळे मी वाचले, परंतु पोलीस व वकिलांमधील दंगल काही टळली नाही, असेही बेदी यांनी म्हटले आहे.

15 जानेवारी 1988 दुपारी दोनची वेळ होती. नवी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजची एक विद्यार्थिनी कॉलेजच्या महिला स्वच्छतागृहातून बाहेर पडली. तेव्हा तिने ज्या ठिकाणी पर्स ठेवली होती त्या पर्समधील पैसे व काही वस्तू गायब झालेल्या आढळल्या व त्याच वेळेत तिथून एक माणूस झपाटय़ाने निसटताना दिसला. त्या विद्यार्थिनीने कॉलेजमधील काही सहकाऱयांना सोबत घेऊन संशयिताचा पाठलाग केला आणि त्याला पकडले असता त्याच्याकडे 110 रुपये व काही वस्तू सापडल्या. कॉलेजच्या प्रिन्सिपलनी तक्रार केल्यामुळे पोलीस त्याला घेऊन गेले. गुन्हा दाखल झाला. तेव्हा खोटे नाव सांगणारा तो इसम वकील व सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला बेडय़ा घालून तीस हजारी कोर्टात हजर केले असता हजारी कोर्टातील वकिलांनी संशयित वकिलाला बेडय़ा घातल्या म्हणून कोर्टातच दंगा सुरू केला. बेमुदत संप पुकारला. त्या वेळी किरण बेदी या त्या झोनच्या उपायुक्त होत्या. दंगेखोर वकिलांनी गलिच्छ भाषेत निर्भर्त्सना करून बेदींना निलंबित करण्याची मागणी केली. बेदी यांना निलंबित केले नाही, परंतु त्यांची मिझोरामला बदली करण्यात आली. ही सर्व पार्श्वभूमी पाहता पोलीस कायम जात्यात असतात असे दिसते. दिल्लीचे पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक हे दिल्ली पोलिसांच्या पाठीशी आहेत. परंतु तेथील पोलिसांचे ढासळलेले मनोधैर्य चिंतनीय आहे.

पूर्वी मोर्चा, आंदोलनात लाठीमार होत होते. परंतु आता पोलिसांनी लाठीमार सुरू करण्याआधीच त्यांच्यावर जमावाकडून हल्ले होत आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत आहे. मग का नाही कर व महागाई वाढणार? अलिकडेच मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढणाऱ्या जमावाने बेस्ट बसेस फोडल्या, पोलीस ठाण्यात घुसले व सार्वजनिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान केले. तेव्हा आता फक्त पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. लोकांचे   tendency temperament दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कुणाकडे संयम व सुज्ञपणा राहिलेला नाही. कुणी परिणामाची चिंताही करीत नाही. दंग्यात भाग घेतल्यानंतर जेल, कोर्ट, कचेऱ्या सुरू होतात याचेही कुणी भान ठेवत नाही. त्यामुळे शीघ्रकोपी व कायदे न पाळणाऱ्या लोकांमुळे तसेच अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या बदमाश सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांमुळे या देशात पुन्हा एकदा आणीबाणी येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या