पोलीस डायरी : महिलांची फसवणूक वाढली

>>प्रभाकर पवार<<

इंटरनेट सेवा सुरू होऊन आपल्या देशात दोन दशकांपेक्षाही अधिक काळ लोटला आहे. जग जवळ आले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही टाचणी पडली तरी त्याचा आवाज सोशल साइटस्च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो. सोशल मीडियालाही एक तप लोटून गेले आहे. फेसबुक, व्हॉटस्ऍप, ट्विटर आदी सोशल साइटसच्या अति वापरामुळे मात्र आजची तरुण पिढी, लहान मुले बिघडत चालली आहेत. आज कुठल्या मुलाच्या हातात स्मार्ट फोन नाही अशी शहरी भागातील मुलं शोधावी लागतील. इंटरनेटचे सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तितके तोटेही आहेत. लहान मुलांपासून ते 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत फेसबुक, व्हॉटस्ऍप, ट्विटर आदी सोशल साइटस्चा व्हायरस सर्वांना जडला आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. काही रस्त्यावर आले आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली लोक कसेही व्यक्त होत आहेत. टीकाटिप्पणी करीत आहेत. त्यातून हिंसाही घडत आहेत. गुन्हय़ांचे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांनी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे धोक्याचे झाले आहे. आज फेसबुकवर महिलांना मोठय़ा प्रमाणात फसवले जात आहे. फसवणाऱयांमध्ये नायजेरियन टोळय़ा अधिक आहेत. हे खरे जरी असले तरी आता ‘फेसबुक’वर बनावट प्रोफाइल पोस्ट करून अगदी गल्लीबोळातील स्थानिक लफंगे तरुण-तरुणींना फसवत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या सायबर सेलमध्ये रोज असंख्य तक्रारी केल्या जात आहेत. क्रेडिट, डेबिट कार्डचे पिनकोड नंबर मिळवून एटीएममधून बँक खातेदाराचे पैसे काढले जात आहेत. थेट बँकांमधून लाखो, करोडो रुपये परस्पर फ्रॉड करून वळते केले जात आहेत. त्यामुळे आता बँकांमध्येही आपली सेव्हिंग सुरक्षित नाही.

फेसबुकवरील दोस्ती विशेषतः घटस्फोटित व विधवा महिलांना अलीकडे महागात पडत आहे. खोटय़ा प्रोफाइलला भाळून बऱ्याच महिला अज्ञात व्यक्तीच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ला प्रतिसाद देतात. दोस्ती वाढवितात, परंतु काही दिवसांतच त्यांच्या पदरी निराशा पडते. लग्नाचे आमिष दाखविणारा (देशी-परदेशी पाहुणा) लफंगा असल्याचे फसवणूक झाल्यावर लक्षात येते. ‘‘मी सैन्यात कर्नल आहे. मी अनिवासी हिंदुस्थानी आहे. मी हॉटेल व्यावसायिक आहे अशी बतावणी करणारे भामटे आपला एक स्मार्ट फोटो (नसलेला) Morphing करून फेसबुकवर पोस्ट करतात. या साऱ्या बतावणीला हिंदुस्थानी महिला भाळतात आणि तो लफंगा सांगेल त्याप्रमाणे वागतात. मी आपणास एक गिफ्ट पाठवीत आहे असे सांगून त्या महिलेला त्या गिफ्टचा स्क्रीन शॉट घेऊन व्हॉटस्ऍपवर टाकतात. त्यानंतर कुणी तरी एअरपोर्टवर आपण कस्टम अधिकारी असल्याचे सांगून त्या महिलेला स्टॅम्प डय़ुटी भरण्यासाठी फोन करतो. त्याप्रमाणे ऑनलाइन ती महिला दिलेल्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करते. त्यानंतर पुन्हा हाच तथाकथित कस्टम अधिकारी गिफ्टमध्ये लाखो रुपयांचे परकीय चलन आहे. त्याचीही आपणास डय़ुटी भरावी लागेल असे सांगून काही लाख रुपये त्या महिलेला ऑनलाइन भरायला सांगतो. त्याप्रमाणे ती महिला भरते आणि फसते. हा सारा बनाव असतो. एअरपोर्टवरून कुणीही कस्टम अधिकारी फोन करीत नसतो तर त्या लफंग्याचा कुणीतरी मित्र अथवा मैत्रीण दूरवरून फोन करीत असते. असाच प्रकार मुंबईच्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकताच घडला.

‘फेसबुकवर तरुणींना मैत्रीच्या जाळय़ात अडकवून व त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून फसविण्यामध्ये नायजेरियन टोळय़ा अग्रेसर आहेत. नायजेरियन टोळीतील चार जणांना नुकतीच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली. या टोळीतील एकाने आपण अमेरिकन लष्करात कॅप्टन असल्याचे भासवून मुंबईतील लोअर परळ भागातील एका शिक्षिकेला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपल्या जाळय़ात अडकवले होते. त्या शिक्षिकेलाही गिफ्ट पाठवून एअरपोर्टवर डय़ुटी भरण्यासाठी (ऑनलाइन) सांगितले होते. त्या शिक्षिकेने आपल्या अमेरिकन मित्राने  गिफ्ट पाठविले असल्याच्या आनंदात प्रथम 68 हजार रुपये ऑनलाइन भरले. पुन्हा जेव्हा दोन लाख भरा. गिफ्टमध्ये काही लाखांचे डॉलर्स आहेत असे त्या तथाकथित कस्टम अधिकाऱ्याने सांगितले तेव्हा त्या शिक्षिकेला संशय आला आणि तिने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनीही तत्काळ दखल घेऊन ज्या खात्यात 68 हजार ऑनलाइन भरले गेले होते ते खाते बँक अधिकाऱयांची मदत घेऊन तपासले असता बँक खाते बंगळुरू येथील असल्याचे उघड झाले.

बंगळुरूमधून झाकी उल्ला शरीफ या खातेदाराला ताब्यात घेतल्यावर नायजेरियन टोळीचा पर्दाफाश झाला. अशा या टोळय़ा देशभरातील प्रमुख शहरांत असून खोटी कागदपत्रे सादर करून बँक खाती उघडतात व ऑनलाइन फ्रॉड करून पैसे आपल्या साथीदारांच्या बँक खात्यावर वळते करतात. फेसबुक, व्हॉटस्ऍप, ई-मेल आदी माध्यमांतून रोज हजारो लोकांना बँक फ्रॉड करणाऱ्या टोळय़ा फसवीत आहेत. त्यात तरुणींना विधवा व घटस्फोटीत महिलांना लग्नाचे आमिष दाखवून मोठय़ा प्रमाणात फसवले जात आहे. लग्न जुळवणारी matrimony सारखी संकेतस्थळंही आता भरवशाची राहिलेली नाहीत. संकेतस्थळावर खोटी माहिती देऊन तरुणींची फसवणूक केली जात आहे. मुंबईच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे व त्यांचे सहकारी पोलीस निरीक्षक केदार पवार, एपीआय वैशाली चव्हाण आदी पोलीस पथकाने प्रदीप सावंत या खोटय़ा नावाने संकेतस्थळावर वावरणाऱ्या प्रवीण कनोजिया या भामटय़ाला एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक केल्याचे उघड झाल्यावर सापळा रचून अलीकडे अटक केली. फेसबुक, matrimony सारख्या संकेतस्थळावर खोटी माहिती सादर करून जशी तरुणींची, महिलांची फसवणूक केली जाते तशी फसवणूक तरुणांचीही केली जाते. अत्यंत मादक, मोहक दिसणाऱ्या व रेखीव बांधा असलेल्या तरुणी morphing केलेला फोटो फेसबुक किंवा संकेतस्थळावर टाकतात. त्यात ती तरुणी आपण खूप काही मोठी ‘स्टार’ असल्याची बडय़ा बापाच्या घरची मुलगी असल्याचे भासवून विवाहेच्छुक तरुणाला जाळय़ात अडकवून त्याचे बँक खाते खाली करते तेव्हा जनहो, सावधान! जगभरात सायबर क्राइम झपाटय़ाने वाढत आहे. फेसबुक असो की व्हॉटस्ऍप असो. कोणत्याही सोशल साइटवर आपली व आपल्या कुटुंबीयांची माहिती सार्वजनिक करू नका. फेसबुकवर येणाऱ्या अनोळखी फ्रेंडस रिक्वेस्टवर विश्वास ठेवून फसू नका. अनोळखी मित्र कधी तुमचा घात करतील सांगता येणार नाही.

एकदा तुमच्या खात्यातून पैसे गेले की ते परत मिळण्याची शक्यता कमी. कारण सायबर गुह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडे पुरेसा प्रशिक्षित वर्गच नाही. यंत्रसामुग्रीही अपुरी, तपासाच्या मर्यादाही ठरलेल्या. त्यामुळे लोकांच्या अपुऱ्या ज्ञानाचा व इंटरनेटमधील तांत्रिक पळवाटांचा गैरफायदा घेऊन देशी-परदेशी भामटे रोज करोडोंची लूट करीत आहेत. त्यामानाने पोलिसांचे Detection 30 टक्केही नाही. Recovery ही फारशी होत नाही. मुंबई पोलिसांच्या दरमहा पगारातील 25 लाख रुपये मागे भामटय़ांनी ‘एटीएम’मधून काढले. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. महाराष्ट्रात गेल्या वर्षी सायबर क्राइमचे विविध कलमांतर्गत चार हजार गुन्हे दाखल झाले. यावरून स्ट्रीट क्राइमपेक्षा Cyber crime किती भयानकपणे वाढत आहे ते पहा!