पोलीस डायरी – खाकीतील ‘देवाला’ अखेरचा सलाम!

1402

>> प्रभाकर पवार

राम राम देवा!’ हा कणखर आवाज आजही साऱ्या पोलीस दलात घुमत आहे. परंतु आता हा दमदार आवाज आपणास येथून पुढे ऐकावयास मिळणार नाही. राज्य पोलीस दलाचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद सिद्धेश्वर इनामदार यांनी गेल्या आठवडय़ात आपणा सर्वांचा निरोप घेतला. प्रकृतीने अत्यंत तंदुरुस्त असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील या देवाने खऱ्या अर्थाने साऱ्यांनाच अखेरचा रामराम ठोकला. मुंबईच्या कफ परेड येथील शलाका या इमारतीमध्ये राहणाऱ्या 80 वर्षीय इनामदार यांना अस्वस्थ वाटल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु काही वेळातच (8 नोव्हेंबर रोजी) त्यांचे निधन झाले. याचा साऱ्या पोलीस दलाला व त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली असून अलीकडेच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. त्या धक्क्यातून ते सावरत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

अरविंद इनामदार हे सांगली जिह्याच्या तडसर गावचे! महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर देशभरात ब्राह्मणांची घरे जाळण्यात आली. त्यात अरविंद इनामदार यांचा इनामदार वाडाही जाळण्यात आला. तेव्हा अरविंद इनामदार 8 वर्षांचे होते. तेव्हाच अरविंद इनामदार यांनी डोळय़ासमोर पेटलेला आपला वाडा व लुटालूट पाहून पोलीस अधिकारी व्हायचे ठरविले. प्रचंड वाचन, भारदस्त व्यक्तिमत्त्व व कुशाग्र बुद्धीमुळे 1964 साली अरविंद इनामदार यांची ‘यूपीएससी’तर्फे आयपीएस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात निवड झाली. तेव्हापासून या कडक शिस्तीच्या, स्पष्टवक्ता अधिकाऱ्याचा जो काही झंझावात सुरू झाला तो 2000 साली थांबला. राज्यकर्त्यांच्या दैनंदिन कामकाजातील वाढत्या हस्तक्षेपामुळे अरविंद इनामदार यांनी (सेवेचे 8 महिने शिल्लक असताना) पोलीस महासंचालक असताना राजीनामा दिला. चिंतामणराव देशमुखांची आठवण व्हावी इतक्या तडकाफडकी इनामदार यांनी राजीनामा देऊन तत्कालीन गृहमंत्र्यांना चपराक दिली. त्यामुळे इनामदार यांचे 10 लाख रुपयांचे नुकसानही झाले.

अरविंद इनामदार यांची एक कडक शिस्तीचे व प्र्रामाणिक अधिकारी म्हणून राज्य पोलीस दलात ओळख होती. आपल्या 36 वर्षांच्या सेवेत त्यांनी पोलीस दलाला शिस्त लावण्याचा त्यांच्या कार्यपद्धतीत बद्दल करण्याचा, त्यांच्या समस्या सोडविण्याचा व पोलिसांच्या कामकाजात मराठी ठसा उमटविण्याचा अफाट प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे व गुह्याचा तपास कसा करावा यासाठी पुस्तिकाही छापल्या. इंग्रजीत असणारी पोलीस मॅन्युअल मराठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना नीट समजावीत म्हणून मराठीत प्रकाशित केली. पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक पोलीस कार्यालयाजवळ वृक्षारोपण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 7 लाख झाडे पोलीस ठाण्याच्या आवारात लावली. जिथे जिथे बदली होईल तिथे तिथे झाडे लावायचे.  पोलिसांच्या बढत्या व बदल्या कधी त्यांनी रोखल्या नाहीत. संपूर्णपणे पोलीस दलाला वाहून घेणाऱ्या या कडक शिस्तीच्या पोलीस अधिकाऱ्याचा पोलिसांमध्ये प्रचंड दबदबा होता. परंतु त्यांच्या वेल्फेअरसाठीही सर्वात जास्त झटणारा हा पहिलाच पोलीस महासंचालक होता. इनामदार हे खंबीर स्पष्ट वक्ते होते. त्यामुळे त्यांचे कधी राज्यकर्त्यांशी फार काही जमले नाही. यामुळे राज्यकर्त्यांनी कायम त्यांना अडगळीत टाकण्याचा, दुर्लक्षित ठिकाणी नेमणूक करण्याचा सतत प्रयत्न केला. त्यांना मुंबईचा कमिशनरही हाऊ दिले नाही. तरीही मुंबई क्राइम ब्रँचच्या सहपोलीस आयुक्तपदी असताना अरविंद इनामदार यांनी मुंबईतील गँगवॉर मोडून काढण्यासाठी कंबर कसली. भायखळय़ाच्या दगडी चाळीत धाड घालून मोठा शस्त्र्ासाठा हस्तगत केला. प्रथमच स्टेनगन जप्त केली. अरुण गवळीवर टाडाची कारवाई केली. त्यामुळे तो 6 वर्षे बाहेर येऊ शकला नाही. दाऊदच्या पाकमोडिया स्ट्रीट येथील अड्डय़ांवर धाडी घालून दोन कोटी रुपये किमतीचे सोनेही अरविंद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली जप्त करण्यात आले होते. संघटित गुंड टोळय़ांचे कंबरडे मोडणाऱ्या अरविंद इनामदार यांनी जळगाव सेक्स स्कँडलचाही उत्कृष्ट तपास केला होता. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व अंडरवर्ल्डशी संबंध ठेवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची इनामदार यांनी कधीच गय केली नाही. कर्तव्यदक्ष पालीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करून त्यांचे नेहमीच मनोधैर्य वाढविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अधिकाऱ्यांपेक्षा त्यांनी पोलीस शिपायांचे प्रश्न सोडविण्याला कायम प्राधान्य दिले. अशा या (Good Human being) चांगल्या अधिकाऱ्याला वाचनाची प्रचंड आवड होती. कुसुमाग्रज हे त्यांचे दैवत होते. कुसुमाग्रज यांनी आपला ‘पाथेय’ हा कवितासंग्रह जेव्हा अरविंद इनामदार यांना अर्पण केला तेव्हा तर ते धन्य झाले. अशा या साहित्यप्रेमी आयपीएस अधिकाऱ्याला गाण्यांचीही आवड होती. आवाजातील मार्दव टिकविण्यासाठी ते रोज रियाझही करायचे. तरीही त्यांच्या आवाजातील जरब कधी कमी झाली नाही. आजही घरचा फोन खणखणला आणि उचलला की त्यांचा ‘राम राम देवा’ हा कणखर आवाज आमच्या कानात घुमतो अशा या देवाला आमचा अखेरचा सलाम!

आपली प्रतिक्रिया द्या