मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, सोशल मीडियाची मदत

माहीम समुद्रकिनारी सोमवारी दुपारी अज्ञात सुटकेसमध्ये सापडलेल्या मानवी अवयवामुळे खळबळ उडाली आहे. ते अवयव कोणाचे असतील याचा अद्याप थांगपत्ता लागला नसून मृत व्यक्तीला शोधून काढण्यासाठी पोलीस आधार लिंक आणि सोशल मीडियाची मदत घेणार आहेत.

सोमवारी दुपारी मगदूमबाबा शहा दर्ग्याच्या मागे एक बेवारस सुटकेस समुद्राच्या पाण्याने वाहून आलेली लोकांच्या निदर्शनास पडली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ती सुटकेस उघडली तेव्हा सुटकेसमध्ये केवळ डावा हात, गुडघ्यापासून खाली उजवा पाय आणि गुप्तांग असे अवयव सापडले. तसेच तीन शर्ट, दोन पॅण्ट आणि एक स्वेटरदेखील सापडले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कोर्टाला पत्र लिहून त्या हाताच्या पंजाच्या सहाय्याने आधार लिंक मिळावे अशी विनंती केली आहे. आधार लिंक मिळाली तर ते अवयव कोणाचे आहेत ते स्पष्ट होईल. पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील मृत व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

त्या टेलरलादेखील शोधला

सुटकेसमध्ये मानवी अवयवांबरोबर शर्ट, पॅण्ट आणि स्वेटरदेखील सापडले होते. त्या कपडय़ांवर असलेल्या टेलरच्या लेबलवरून पोलिसांनी कुर्ल्यातील त्या टेलरचादेखील शोध घेतला, पण त्या टेलरकडून काहीच आवश्यक माहिती मिळू शकली नाही असे पोलीस सूंत्राकडून सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या