बँकेत नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना फसवणारी टोळी गजाआड, पायधुनी पोलिसांची नोएडात कारवाई

‘नोकरी डॉट कॉम’वरून बोलत असल्याचे भासवून ऑक्सिस बँकेत नोकरी मिळवून देऊ अशी बतावणी करीत वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाने पैसे उकळणाऱ्या नोएडा येथील एका रॅकेटचा पायधुनी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तिघा भामटय़ांना बेडय़ा ठोकून पोलिसांनी 14 मोबाईल, सीमकार्ड, लॅपटॉप, एटीएम, पॅन, आधारकार्ड, पासबुक, चेकबुक आदी साहित्य जप्त केले आहे.

कमल (नाव बदललेले) यांना भामटय़ांनी कॉल केला होता आणि आम्ही ‘नोकरी डॉट कॉम’मधून बोलत असल्याचे सांगत तुम्हाला ऑक्सिस बँकेत नोकरी देऊ असे आमिष दाखवले. त्यानंतर बँकेचा बोगस ई-मेल आयडी आणि ‘नोकरी डॉट कॉम’चा बोगस डोमेन तयार करून वेगवेगळी चार्जेस फी भरण्याची मागणी करून कोटक बँक व मोबीकविक वॉलेटद्वारे आरोपी त्यांच्या येस बँकेच्या खात्यात कमल यांच्याकडून 1 लाख 38 हजार जमा करण्यास सांगितले. त्यानुसार कमल यांनी पैसे भरले. त्यानंतर आरोपींनी कमल यांना टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कळताच कमल यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पायधुनी पोलिसांचे एक पथक नोएडा येथे धडकले.

नोएडा येथे बोगस कॉल सेंटर खोलून बँकेत नोकरी लावतो असे आमिष दाखवत बेरोजगारांना फसवणारे तीन भामटे हाती लागले. कैलास रामचंद, सतीश सिंग आणि गीता सिंग अशी आरोपींची नावे असून त्यांनी अशा प्रकारे अजून किती बेरोजगारांना चुना लावला आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या