परभणीतील नानलपेठ पोलीस ठाणे सील; एका पोलिसाला कोरोनाची लागण

709

परभणीतील नानलपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संपूर्ण पोलीस ठाणेच सोमवारी सील करण्यात आले. ठाण्याचे मुख्यद्वार बॅरीगेटस लावून बंद करण्यात आले आहे. परभणी शहरातील पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी रात्री आला. हे पोलिस कर्मचारी नानलपेठ पोलीस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस ठाणे आणि कर्मचाऱ्याचे निवासस्थान असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसराच्या निर्जंतूकीकरणाचे काम सुरु आहे.

या इमारती धील रहिवासी, पोलीस कर्मचारी आणि कोरोनाबाधित कर्मचाऱ्याच्या कुटूंबियाच्या तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब घेण्याचे काम रविवारी रात्री सुरु करण्यात आले आहे. हे पोलिस कर्मचारी नानलपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यामुळे सोमवारी सकाळी नानलपेठ पोलिस ठाणे सील करण्यात आले आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याने दोन दिवसांपूर्वी मित्रासोबत पार्टी केली असल्याचे समजते. त्यामुळे या पार्टीत असणारे त्यांचे मित्रांचेही स्वॅब घेतले जातील असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

परभणी जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या पुढाकारातून व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिसोदिया पॅथोलॉजी लॅब यांच्या सहकार्याने रविवारी कोरोना संशयित रुग्णांसाठी स्वॅब टेस्ट लॅब सुरू करण्यात आली आहे. रविवारी रात्री जिल्हा रुग्णालयात 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकाच दिवशी पहिल्यांदाच इतके रुग्ण आढळले असून यात गंगाखेडमधील 11, परभणीतील 2 आणि सेलूच्या एका रुग्णाचा समावेश आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 36 वर गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या