खबऱ्याच्या नावाखाली ड्रग्जची डिलिंग ,दीड कोटीच्या हेरॉईनसह पेडलरला अटक

305

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या नावाखाली ड्रग्ज पेडलरर्सकडून पैसे उकळण्याबरोबरच गुपचूप ड्रग्जची डिलिंग करणाऱ्या एका भामटय़ाला अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी युनिटने हेरॉईन ड्रग्जसह रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्या पेडलरकडून तब्बल 1 कोटी 41 लाख किमतीचा हेरॉईनचा साठा जप्त केला.

खालिद वासी खान (51) असे या ड्रग्ज पेडलरचे नाव आहे. मुंब्य्रात राहणारा खालिद काही वर्षांपूर्वी अमली पदार्थविरोधी पथकासाठी खबऱ्याचे काम करीत होता. त्याने अनेक ठिकाणी या पथकाव्यतिरिक्त स्थानिक पोलिसांकडून छापेमारी करून ड्रग्ज तस्करांना पकडून दिले होते, मात्र त्यानंतर खालिदने स्वतः ड्रग्जची डिलिंग करण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्याला गांजासह पकडले होते. शिवाय त्याच्या पत्नीलादेखील ड्रग्जसह पकडले होते. मात्र तरीदेखील खालिदने मुंबईतील ड्रग्ज तस्करांमध्ये पोलिसांचा खबऱ्या असल्याचे सांगून दहशत निर्माण केली होती. त्याआधारे तो ड्रग्ज तस्करांकडून पैसेदेखील उकळत होता. इतकेच नाही तर त्याने हायप्रोफाइल नशेबाजांना ड्रग्ज पुरवायचे कामदेखील सुरू केले होते. दरम्यान, वरळी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अमर मऱहाटे, सुदर्शन चव्हाण व पथक डॉकयार्ड रोड परिसरात गस्त घालत असताना तेथे खालिद पोलिसांच्या नजरेस पडला. त्यामुळे त्याला थांबवून त्याची अंगझडती घेतल्यावर त्याच्याकडे 470 ग्रॅम वजनाचा 1 कोटी 41 लाख किमतीचा हेरॉईन ड्रग्जचा साठा सापडल्याचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या