अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय कुरुंदकरांचं निलंबन

सामना ऑनलाईन । मुंबई

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ताप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक अभय कुरुंदकर याचं शनिवारी निलंबन करण्यात आलं आहे. ठाणे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून अभय कुरुंदकर याचं निलंबन करण्यात आलं आहे. अभय कुरुंदरकरनं अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचा संशय नवी मुंबई पोलिसांना आहे. दरम्यान अभय कुरुंदकर आणि राजू पाटील यांना २ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

४२ वर्षीय बिद्रे गेल्या दीड वर्षापासून बेपत्ता आहेत. तपास अधिकाऱ्यांनी कुरुंदकर आणि पाटील यांनी ११ एप्रिल २०१६ रोजी बिद्रे य़ांचं अपहरण करून खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याचे बिद्रे यांच्याशी विवाहबाह्य संबंध होते. बिद्रे यांनी कुरुंदकर याच्या मागे लग्नाचा तगादा लावला होता. त्यावरुनच कुरुंदकर याने बिद्रे यांची हत्या करुन त्यांचा मृतदेह भाईंदरच्या खाडीत फेकला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कुरुंदकर यांनी बिद्रे यांच्या वडिलांना अश्विनी बिद्रे काही दिवसांसाठी उत्तराखंडला मेडीटेशलला जाणार असल्याचा संदेश पाठवला होता. पोलिसांना बिद्रेच्या घरामध्ये एक पत्र मिळालं ज्यामध्ये कुरुंदकरांनी त्यांना मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी बिद्रे यांचा लॅपटॉपदेखील ताब्यात घेतला असून त्यात कुरुंदकराविरोधात पुरावे सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या