लाचेची मागणी करणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

157

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

वाळुचे ट्रँक्टर सोडण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या गोंदी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकांवर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत त्याविरुद्ध लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोंदी पोलीस स्टेशन अंतर्गत शहागड येथे पोलीस चौकी आहे. या चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विकास भगवान कोकाटे यांनी गेवराई येथील प्रमोद सखाराम मोटे रा.गेवराई जि.बीड यांचे ट्रँक्टर गोदा पात्रातुन शहागड हद्दीत अवैध वाळु उपसा करुन वाहतूक करीत असतांना पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे यांनी १४ फेब्रुवारी रोजी पकडले होते. पोलिसांनी पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी तसेच परिसरात नियमित वाळु चालू ठेवायाचा असेल तर कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी हजार, पाचशे रुपये द्या आणि वाळु उपसा करा असे उपनिरीक्षक कोकाटे यांनी फिर्यादी प्रमोद मोटे यांच्याकडे मागणी केली.

या मागणीची शुटिंग करुन मोटे यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली त्यानुसार बीड पोलीस निरीक्षक गजानन वाघ यांनी यासंदर्भात जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार जालना येथील पोलीस निरीक्षक अजिनात काशिद यांनी आज सकाळी शहागड येथे जाऊन लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे याला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर करण्यासाठी जालना येथे नेण्यात आले. पुढील तपास पोलीस
निरीक्षक अजिनात काशीद हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या