पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपी सातपुतेच्या मुलाला पोलिसांची नोटीस

69

सामना प्रतिनिधी । नगर

पथदिवे घोटाळ्यातील फरार आरोपी रोहिदास सातपुते याने मुलाकरवी मुख्यालय सोडण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज आयुक्त घनश्याम मंगळे यांना दिला होता. पोलिसांनी यासंदर्भात त्या मुलाची चौकशी करणार असल्याची माहिती न्यायालयात दिल्यानंतर सातपुते याचा मुलगाही फरार झाला असून, पोलिसांनी त्याला जबाब देण्यासाठी नोटीस बजावली आहे. दरम्यान, उद्या निलंबित प्रभारी उपायुक्त विक्रम दराडे आणि मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

महापालिकेत महिन्याभरापूर्वी ४० लाख रुपयांचा पथदिवे घोटाळा उघड झाला होता. बजेट रजिस्टरला कामांची नोंद न करताच ठेकेदाराचे बिल दिल्याचा प्रकार समोर आल्याने महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. दिवसेंदिवस या घोटाळ्याची व्याप्ती वाढतच असल्याचे दिसून येत आहे. चार दिवसांपूर्वी विक्रम दराडे व दिलीप झिरपे यांना अटक केल्यानंतर त्यांची काल न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या दोघांनीही जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. न्यायालयाने उद्या म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारी पक्षाला दिले आहेत. ते दाखल झाल्यानंतर त्यांच्या जामीन अर्जावर निर्णय होणार आहे.

मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर याबाबतचा अहवाल पोलिसांकडे पाठविण्याचा निर्णय आयुक्त मंगळे यांनी घेतला असून, त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणार असल्याचे दिसून येत आहे. पथदिवे घोटाळा प्रकरणातील फरार आरोपींचा अद्यापि शोध लागलेला नाही. घोटाळ्यात नाव आल्याचे समजल्यानंतर रोहिदास सातपुते हा फरार झाला होता. दरम्यानच्या काळात त्याने मुख्यालय सोडण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज आपल्या मुलाकरवी आयुक्तांना सादर केला होता. यासंदर्भात सातपुतेच्या मुलाची चौकशी करणार असल्याची माहिती तपासी अधिकारी सुरेश सपकाळे यांनी न्यायालयात दिली होती. त्यानंतर तोही फरार झाला असून, पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी सातपुते याच्या मुलाला जबाब देण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

महापालिकेतील दुसरे उपायुक्त रवींद्र चव्हाण हे वैद्यकीय रजेवर गेल्याने त्यांच्या चौकशीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तपासी अधिकाऱयांनी आयुक्तांची भेट घेऊन सातपुतेच्या पत्रासंदर्भात, तसेच चव्हाण यांच्या रजेच्या अर्जासंदर्भात चौकशी केली जाणार असल्याचे पुढे आले आहे. चव्हाण यांचा याआधीही जबाब नोंदविण्यात आलेला आहे. पथदिवे घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलीस अनेकांना पुढील तपासासाठी बोलवत आहे. त्यामुळे अनेक नावे पुढे येण्याची शक्यता आहे. सातपुते व सावळे यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर लवकरच कारवाई केली जाणार आहे. गेल्या महिनाभरापासून या दोन्ही आरोपींचा शोध लागलेला नाही.

रोहिदास सातपुते यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेचे आयुक्त घनश्याम मंगळे यांना पत्र देऊन मला मुख्यालय सोडण्याची परवानगी देण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जाची चौकशीही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रशासकीय पातळीवरून अन्य माहिती घेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. लिपिक भरत काळे व आरोपी ठेकेदार यांच्याकडून अन्य माहिती उजेडात आल्यामुळे त्यादृष्टीने तपास सुरू करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या