भावी वधुच्या चारित्र्याचा संशय, पोलीस कर्मचाऱ्याने पेटवून घेतले

15

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

भावी वधुच्या चारित्र्याच्या संशयावरुन ऐन १५ दिवसानंतर येऊन ठेपलेल्या लग्नाला नकार देत मुख्यालयातील दंगा काबू पथकात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने रागाच्या भरात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी मयुरपार्क मधील पार्वतीनगरात घडली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात मुलीसह तिचा भाऊ आणि मामाविरूध्द नोंद करण्यात आली आहे.

मयुर पार्क परिसरातील पार्वतीनगरात राहणारा अनिल अशोक घुले (२५) हा मुख्यालयातील दंगा काबू पथकात कार्यरत आहे. वडिलांच्या निधनानंतर तो अनुकंपा तत्त्वावर २०१४ मध्ये नोकरीला लागला होता. त्याचे चार महिण्यापूर्वी भोकरदन येथील आशा गायकवाड हिच्यासोबत त्याचा साखरपुडाही झाला होता. १ एप्रिल रोजी त्यांचे लग्न होणार होते.

भावी वधु फोन घेत नसल्याने आला चारित्र्याचा संशय
साखरपुडा झाल्यानंतर अनिल याने होणाऱ्या नववधुशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नसल्याने अनिलचा तिच्या चारित्र्यावर संशय बळावला. यातून त्याने चक्क लग्नास नकार दिला. त्यामुळे त्याच्या सासरकडील मंडळी घाबरुन गेली. रविवारी रात्री मुलीचा भाऊ व मामा अनिलच्या घरी पोहोचले. तेथे ठिकाणी बैठक झाली. अनिलने लग्नास नकार दिला. तेव्हा संतपालेल्या वधुकडील मंडळींनी साखरपुड्यात २५ लाख रुपये खर्च झाला असून त्याची भरपाई करण्यासाठी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची धमकी दिली होती.

आईशी झालेल्या वादानंतर जाळून घेतले
रात्रीची बैठक संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिल याने पुन्हा आईशी वाद घालणे सुरु केले. त्याचा लग्नाला विरोध कायमच होता. त्याच्या आईने त्याची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु अनिल ऐकण्याचा मनस्थितच नव्हता. त्याने रागाच्या भरात घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीतुन पेट्रोल काढले, तेच अंगावर ओतुन घेत स्वत:ला पेटवून घेतले. यात तो ९० टक्के भाजला. अनिल सध्या घाटीत रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहे.

मी पोलीस आहे माझ्या मित्राना बोलवा…
पेट्रोल टाकून पेटवून घेतल्यानंतर जेव्हा परिसरातील रहिवाशांनी त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकून आग विझवली. तेव्हा गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेतील अनिलने ‘मी चार्ली पोलीस आहे. माझ्या मित्रांना लवकर बोलवा’ असे विनवणे सुरू केले. नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास फोन केला. तसेच १०८ रुग्णवाहिकेलाही पाचारण केले. परंतु, ना पोलीस आले, ना रुग्णवाहिका. शेवटी हतबल रहिवाशांनी एका खाजगी वाहन चालकाच्या विनवण्या केल्या आणि खासगी वाहनातून अनिल घुले यास घाटी रुग्णालयात दाखल केले. झालेल्या दुर्घटनेतील पोलिसालाही पोलिसांची किंवा शासनाची मदत मिळत नाही तर सामान्य नागरिकांना काय मिळणार अशा शब्दांत रहिवाशांनी संताप व्यक्त केला.

वधुकडील मंडळी छळ करत असल्याचा जवाब
गंभीर भाजलेल्या अनिल याने आपली भावी वधू, तिचा भाऊ शुभम आणि त्यांचे मामा यांनी लग्न करण्यासाठी प्रचंड दबाव टाकला होता. त्यांच्या छळामुळेच आपण अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याचा जबाब अनिल याने दिला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी दिली.जवाबानुसार घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या