शेतकऱ्यांनी काढली शासनाची अत्यंयात्रा, ठाणेदार म्हणतात ‘जा मरा…’

32

प्रसाद नायगावकर । यवतमाळ

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत देण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या आंदोलकांना तिथे उपस्थित असणाऱ्या ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी ‘मरुन जा’, असा अजब सल्ला दिला. यामुळे या भागातील वातावरण तापले होते.

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून येथील तिरंगा चौकात धरणे आंदोलन सुरू आहे. सहाव्या दिवशी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला. शासनाच्या विरोधात अंत्ययात्रा काढत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर तिरडी ठेवली. त्यानंतर आंदोलनस्थळी ठाणेदारांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी, आंदोलक व ठाणेदार यांच्यात बाचाबाची झाली.

मागील सहा दिवसांपासून विधानसभा मतदारसंघनिहाय चक्रीधरणे आंदोलन सुरू आहे. सहाव्या दिवशी वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांनी धरणे दिले. शेतकऱ्यांना बोंडअळीची मदत तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. स्थानिक तिरंगा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत हजारो शेतकरी सहभागी झाले होते. शासनविरोधात घोषणा देत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंत्ययात्रा ठेवली. मडके फोडून आपला राग व्यक्त केला. त्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले. वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, नागरिक, जिल्हा शेतकरी संघर्ष समिती, राष्ट्रीय युवा संघटन, शेतकरी संघटना, शेतकरी वारकरी संघटना, बेंबला कालवे संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस-आंदोलकांत बाचाबाची

अंत्ययात्रा आंदोलनानंतर धरणे आंदोलनाच्या ठिकाणी असलेली वाहने पोलिसांनी जप्त केली. त्यामुळे गोंधळ उडाला. या गोंधळात आंदोलक, शेतकरी व पोलीस यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. पोलिसांनी वाहनं सोडल्यानंतर आंदोलक शांत झाले.

… यानंतर तीव्र आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. मात्र, अजूनही शासनाचे शेतकऱ्यांकडे लक्षच नाही. शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात बोंडअळीची जाहीर केलेली मदत जमा न केल्यास यानंतर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीने यावेळी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या