महिला सहकाऱ्याचा चहा गुप्तांगाने ढवळला, तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू

इंग्लंडच्या पोलीस दलाला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यावर महिला सहकाऱ्याने गंभीर आरोप लावला असून या आरोपांनंतर या अधिकाऱ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ससेक्स पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून महिला पोलीस कर्मचाऱ्याने घडलेला सगळा प्रकार न्यायालयाला सांगितला आहे.

स्टीव्हन ग्रीन असं पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून महिला कर्मचाऱ्याचे आणि घटनेची साक्षीदार असलेल्या दुसऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. तक्रारदार महिलेने म्हटलं आहे की ग्रीन हा महिला कर्मचारी ज्या खोलीमध्ये कपडे बदलतात त्या खोलीमध्ये घुसला होता. त्याने तक्रारदार महिलेला काय वाटेल याचा विचार न करता तिचे खांदे दाबायला सुरूवात केली होती. तक्रारदार महिलेनेने आणखी एक आरोप करताना न्यायालयाला सांगितलं की तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ग्रीनने काही फोटो डाऊनलोड केले होते. हे फोटो चहाच्या ‘मग’वर छापून तो तिला भेट दिला होता. तक्रारदार महिलेला हा प्रकार आवडला नव्हता, ज्यामुळे तिने तो ‘मग’ ग्रीनला परत केला होता.

हा सगळा प्रकार 2020 साली मे ते जुलै या काळात घडला होता. तक्रारदार महिलेने ग्रीनवर गंभीर आरोप करताना न्यायालयाला सांगितलं की त्याने तिच्या चहाच्या कपमध्ये गुप्तांग घालून चहा ढवळला होता. या सगळ्या किळसवाण्या प्रकारानंतर तिने तिच्या वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार घातला होता, ज्यानंतर ग्रीनच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ग्रीन हा अश्लील शेरेबाजीही करत असल्याचं तक्रारदार महिलेने म्हटलं आहे.

तक्रारदार महिलेच्या बाजूने साक्ष देण्यासाठी बरेच जण पुढे आले असून त्यांनी आपण या घटना पाहिल्या असल्याचं म्हटलं आहे. तक्रारदार महिलेच्या बाजूने साक्ष देणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने म्हटलंय की ग्रीन हा कपडे बदलण्याच्या खोलीत घुसला होता. त्याने दार वाजवलं नव्हतं आणि तो जबरदस्तीने आत घुसला होता. पाठी वळून बघायच्या आत ग्रीन तिथून पळाला होता, मात्र आम्ही दार बंद होताना पाहिलं होतं असं या साक्षीदाराने म्हटलं आहे.

ग्रीन याने इतर सर्व आरोप फेटाळले असले तरी आपण लॉकर रुमचा दरवाजा हळूच उघडला असल्याचं मान्य केलं आहे. मी गंमत करत होतो , इतरांना शरम वाटेल असं कृत्य करण्याचा माझा इरादा नव्हता असं त्याने न्यायालयाला सांगितलं आहे. या प्रकरणाची सुनावणी अद्याप संपली नसून साक्षीपुरावे तपासण्याचे काम पुढेही सुरू राहणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या