170 किलो सापडलेला गांजा फक्त 920 ग्राम दाखवला, उरलेल्या गांजाची पोलिसांकडून विक्री

दिल्ली पोलिसांची एक करामत समोर आली आहे. पोलिसांना एका धाडीत 170 किलो गांजा सापडला होता. पोलिसांनी यापैकी फक्त 920 ग्राम गांजाची नोंद केली आणि उर्वरित गांजा विकून परस्पर पैसे वाटू घेतले. या प्रकरणी चार पोलीस कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे.

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात पोलिसांना 170 किलो गांजा सापडला होता. या प्रकरणी गांजा तस्कर अनिलला अटक करण्यात आली. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला आणि त्यापैकी फक्त 920 ग्राम गांजा सापडल्याची नोंद केली. नंतर उर्वरित गांजा पोलीस स्थानकातच लपवून ठेवला होता. नंतर चार पोलिसांनी मिळून एका ड्रग डीलरला हा गांजा विकला आणि त्याचे पैसे आपसांत वाटून घेतले. जेव्हा वरिष्ठांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी याप्रकरणी कारवाई करत दोन उपनिरीक्षक, एक हवालदार आणि एका शिपाई पोलिसांचे तत्काळ निलंबन केले आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या