मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात गोणीत सापडलेल्या महिलेच्या हत्येचा उलगडा झाला. महिलेचे मारेकरी हे तिच्या घरचेच निघाले. ट्रॉम्बे पोलिसांनी महिलेची ओळख पटवून तिची हत्या केल्याप्रकरणी तिचा पती, दिर, नणंदेचा नवरा, त्याची बहीण व आई अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र नगरातील मेट्रोचे काम सुरू असलेल्या एका ठिकाणी गोणीत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. हे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. ट्रॉम्बे पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी या गंभीर प्रकरणाचा तत्काळ तपास सुरू केला होता. अखेर ट्रॉम्बे पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली. रेश्मा जैस्वाल (21) असे तिचे नाव असून ती महाराष्ट्र नगरातच राहणारी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरच्यांकडे तपास सुरू केला. तेव्हा रेश्माचा नवरा, दिर तसेच नणंदेचा पती, त्याची बहीण व आई असे पाच जणांनी मिळून हे हत्याकांड केल्याचे चौकशीत समोर येताच त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पैन्हयालाल (20) असे पतीचे तर दिराचे नाव अशोक आहे.
वरवंटा डोक्यात घातला, तीन दिवस घरातच ठेवले
घरगुती वादातून रेश्माची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दीडएक वर्षापूर्वी रेश्माचे लग्न झाले होते. पण अचानक खटके उडू लागले आणि त्यातून हे हत्याकांड झाले. आरोपींनी कट रचून रेश्माची राहत्या घरात हत्या केली. मसाला कुटण्यासाठी वापरात असलेला वरवंटा तिच्या डोक्यात मारण्यात आला. रेश्मा निपचित पडल्यानंतर त्यांनी तीन दिवस तिला तसेच घरात लपवून ठेवले. मात्र नंतर मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागल्यानंतर आरोपींनी मृतदेह एका खोलीत कोंबला. मग गोणीला पद्धतशीर रॅप केलं आणि संधी साधून मातीच्या ढिगाऱ्याजवळ तो मृतदेह फेकला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.