किर्तीच्या मृतदेहाचा शोध वडाळय़ाच्या नाल्यातून अलिबाग किनाऱ्यावर

43

सामना ऑनलाईन, मुंबई

‘ब्ल्यू ब्लंट’ सलूनमधील फायनान्स मॅनेजर कीर्ती व्यास हिचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी आकाशपाताळ एक केले आहे. आकाशातून शोधण्यासाठी ड्रोन, पाण्यातील शोधमोहीम राबविण्यासाठी मच्छीमार आणि त्यांच्या बोटी तर दलदल आणि खारफुटीमध्ये वीस बेडूक-खेकडेमार यांच्या मदतीने सर्च मोहीम सुरू आहे. मुंबईतच नाही तर मुंबई पोलिसांची पथके नवी मुंबई, अलिबाग या किनाऱयांवरही मृतदेहाचा शोध घेत आहेत.

फरहान अख्तर यांची पत्नी अधुना अख्तर हिच्या ‘ब्ल्यू ब्लंट’ सलूनमध्ये काम करणारी कीर्ती हिची १६ मार्च २०१८ रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणात क्राइम ब्रँचच्या पथकाने तिच्याच कार्यालयातील सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सेजवानी या दोघांना अटक केली. या दोघांनी वडाळा आयमॅक्स चित्रपटागृहाजवळील नाल्यात कीर्तीचा मृतदेह फेकल्याचे सांगितले. यासाठी पोलिसांची युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.

कीर्तीचा मृतदेह शोधण्यासाठी क्राइम ब्रँचच्या विविध युनिटची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत. काही मुंबईत, जेएनपीटी बंदर तर काहीजण अलिबाग येथे मृतदेहाचा शोध घेत आहेत. मृतदेह वाहत गेल्यास या किनाऱयांवर लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून शोधाशोध सुरू आहे. दलदल आणि खारफुटीमध्ये शोध घेण्यासाठी पोलिसांनी वीस बेडूक-खेकडेमार शोधून काढले आहेत. ही मंडळी खारफुटीच्या मुळाशी दलदलीत उतरून मृतदेह शोधत असले तरी अद्याप काहीच हाती लागले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सिद्धेशचे वडाळ्यात वास्तव्य

सिद्धेश भोईवाडा येथे राहत असला तरी त्याचे वास्तव्य वडाळ्यात होते. एका नातेवाईकांकडे तो राहत होता. खाडीसमोरील निवांत ठिकाणी तो ‘वॉकिंग’ साठी यायचा. त्यामुळे त्याला नाल्याच्या आजूबाजूचा परिसर रात्रीचा निर्मनुष्य असतो हे माहीत होते. म्हणून कीर्तीचा मृतदेह टाकण्यासाठी त्याने ही जागा निवडली.

 

आपली प्रतिक्रिया द्या