राष्ट्रवादी काँग्रेसवर अस्तित्वाचे संकट; पवार कुटुंब एकाकी

3560
sharad-pawar

राष्ट्रवादी काँग्रेससमोर सध्या अस्तित्वाचे संकट उभे ठाकले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते पक्षाची साथ सोडून जात आहेत. त्यामुळे पवार कुटुंब एकाकी पडल्याचे दिसत आहे. शरद पवार यांनी 1999 मध्ये ज्या नेत्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला होता, त्यातील अनेक नेत्यांनी आज पक्षांची साथ सोडली आहे.

सुमारे 20 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षातील नेतृत्वावरून झालेल्या मतभेदांमुळे शरद पवार, मेघालयातील पी.ए. संगमा आणि बिहारमधील तारिक अन्वर यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यातील पी.ए. संगमा यांनी 2004 मध्येच शरद पवार यांची साथ सोडली होती. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांसोबत झालेल्या मतभेदांमुळे तारिक अन्वर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेत या तीन नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती. पक्ष संस्थापकांपैकी शरद पवार हे आता एकाकी राहिले आहेत. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने राष्ट्रवीदी काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबतच्या वृत्तात ही माहिती दिली आहे.

राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादीला फटका बसला असतानाच महाराष्ट्रातही पक्षासोबत असलेले अनेक दिग्गज नेते पक्षाची साथ सोडत आहेत. त्यामुळे पक्षासमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्रात पक्ष स्थापनेवेळी शरद पवार यांच्यासोबत असलेले गणेश नाईक, मधुकर पिचड त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंह मोहिते-पाटील त्यांचा मुलगा रणजीतसिंह पाटील, पद्मसिंह पाटील आणि सचिन अहीर या दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. पक्ष स्थापनेत आणि पक्ष वाढवण्यात या नेत्यांचा मोलाचा वाटा होता. या नेत्यांमुळेच राष्ट्रवादी राज्यात सत्तेत आली होती. काँग्रेससोबत आघाडी करून 15 वर्षे ते सत्तेत होते. राष्ट्रवादीकडे स्थापनेपासूनच दिग्गज नेते असल्याने नव्या पक्षासमोर असणारे आव्हान राष्ट्रवादीसमोर नव्हते. राजकीय पाठबळ, साधने, कार्यकर्ते पक्षात होते. राज्यातील या पाठबळामुळे राष्ट्रीय पातळीवरही राष्ट्रवादी महत्त्वाचा पक्ष ठरला होता. मात्र, 2014 मध्ये राज्यातील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीतील नेते राजकीय भविष्य वाचवण्यासाठी पक्षातून बाहेर पडत आहेत. पक्षातील दिग्गज बाहेर पडल्याने पक्ष वाचवण्याचे आव्हान पवार यांच्यासमोर आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या