गरीबांच्या जेवणावर टॅक्स, श्रीमंतांचे पाच लाख कोटींचे कर्ज माफ, केजरीवाल यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘गरीबांच्या जेवणावर टॅक्स आणि श्रीमंतांचे पाच लाख कोटींचे कर्ज माफ’ अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर आज जोरदार हल्लाबोल केला. ट्विटरवर त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोदी सरकारने सरकारी पैशाने आपल्या मित्रांची लाखो कोटींचे कर्जे माफ केली नसती तर देशाची अशी अवस्था झाली नसती, असे केजरीवाल यांनी त्यात म्हटले आहे.

अरविंद केजरीवार यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकार क्रूरपणे पावले उचलत असून पहिल्यांदाच देशात तांदूळ-गव्हावर टॅक्स लावला गेला आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे. पेन्शन सुविधा बंद करण्यासाठीच मोदी सरकारने ‘अग्निवीर’ योजनेची सुरुवात केली असे त्यांनी म्हटले आहे. आठवा वेतन आयोग आणण्यासाठीही केंद्र सरकारने मनाई केली होती आणि मनरेगा योजनेसाठी पैसे नसल्याचेही सरकार म्हणत असल्याचा दावाही केजरीवाल यांनी केला आहे.

भाजपच्या अहंकारामुळेच मित्रपक्ष जातायत

बिहारमध्ये भाजपची साथ सोडून नितीशकुमार यांच्या जेडीयूने राजदबरोबर सरकार स्थापन केले. त्यावरून भाजप प्रचंड अहंकारी होत असल्याचे दिसून येते, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. भाजपच्या अहंकारामुळेच मित्रपक्ष त्यांची साथ सोडून जात आहेत. शिवसेना, अकाली दल यांच्यानंतर जेडीयूनेही भाजपची साथ सोडली. इतकेच नव्हे तर, जनताही भाजपवर नाराज होत असल्याचे चित्र आहे, असे केजरीवाल म्हणाले.