सिद्धूच ‘पायचीत’!

73

माजी क्रिकेटपटू असलेल्या नवज्योतिंसग सिद्धू यांनी अलीकडे अशा राजकीय गुगली टाकल्या की त्यामुळे भलेभले स्तंभित झाले. वास्तविक फिरकी गोलंदाजाची गुगली स्टेपआऊट करून मिडऑनवरून प्रेक्षकांत भिरकवणारे फलंदाज म्हणून सिद्धू ख्यातकीर्त. मात्र राजकारणात त्यांनी ‘गुगलीपटू’ म्हणून जी ख्याती मिळवली त्याला तोड नाही. सुरुवातीला राज्यसभेचा राजीनामा देऊन खुद्द मोदींनाच ‘पायचीत’ पकडले. त्यानंतर नंबर आला तो आपच्या अरिंवद केजरीवालांचा. ‘आप’मध्ये येतो येतो असा गूळ सिद्धू महाशयांनी केजरीवालांना लावला. वास्तविक अशा गुगल्या इतरांना टाकण्यात केजरीवालांचा हातखंडा. मात्र सिद्धू यांनी आपल्याला केव्हा पायचीत केले हे त्यांनाही समजले नाही. त्यानंतर `आवाज ए पंजाब’ चा नारा देत त्यांनी काही सहकाऱ्यांना पायचीत केले. रखडत रखडत ते काँग्रेसवासी झाले. तिथेही मला मुख्यमंत्री करा हे त्यांचे टुमणे सुरूच होते. अमिंरदरिंसग मुख्यमंत्री बनणार असल्याने मला उपमुख्यमंत्री करा हा सिद्धूंचा हट्ट. राहुल गांधींनी तो मान्य केला आणि अमिंरदर यांना तसे सुचवलेही. अमिंरदर यांनी बैठक संपताना राहुल यांना स्पष्ट शब्दांत सांगितले मला कामाचा फ्री-हॅण्ड हवा आहे त्यानुसार काम करू द्या. सिद्धूंना मी उपमुख्यमंत्री बनवणार नाही. मंत्रिमंडळ बैठकीवेळी त्यांना शोधण्यासाठी मला क्रिकेट मैदान किंवा कॉमेडी शोची ठिकाणे शोधत फिरायला वेळ नाही. तुम्हाला तो लाडका असेल तर इथेच काहीतरी त्यांना पद द्या, असा निर्वाणीचा इशारा देऊन अमिंरदर यांनी बैठक संपवली आणि प्रत्यक्ष मंत्रिमंडळातही केवळ दुय्यम दर्जाचे खाते देऊन सिद्धूंची बोळवण केली. राहुल गांधींच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्रीपदाच्या `फ्रंटफूट’वर सिद्धू खेळायला गेले, मात्र कॅप्टनच्या `गुगली’ने अखेर ते स्वत:च पायचीत झाले.

आपली प्रतिक्रिया द्या