तुरुंगात जाऊन आले की निवडणूक सोपी जाते

66

सामना प्रतिनिधी। कोल्हापूर

राज्यात भाजपची सत्ता आहे. मग तुरुंगातील कोठडय़ा भरण्यासाठी ते कशाची वाट पाहत आहेत, असा सवाल करतानाच तुम्ही कोठडय़ा जरूर भरा. त्याला आमची हरकत नाही. पण माणूस एकदा तुरुंगात जाऊन आला की, पुढची निवडणूक त्याला सोपी जाते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लगावला.

चंद्रकांतदादा यांनी अलीकडेच मुंबई भाजपच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांच्या शेजारी दोन-तीन कोठडय़ा ‘रिकाम्या’च आहेत, असा इशारा विरोधकांना दिला होता. पवार यांनी त्याचा आपल्या शैलीत समाचार घेतला. आयुष्यात कधी संधी मिळाली नाही म्हणून सकाळ, दुपार, संध्याकाळ संधी घेतली जाते. चंद्रकांत पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांनी एकदा विधानसभेची निवडणूक लढवावी म्हणजे त्यांना समजेल, असा चिमटा पवारांनी काढला.

नाणारवरून धमकावू नका

नाणार प्रकल्पावरून चाललेले राजकारण योग्य नाही. प्रकल्पाला कोकणात जमीन मिळाली नाही तर तो प्रकल्प गुजरातला जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्या वक्तव्याचा  समाचार घेत गुजरातलाच काय अन्य राज्यांत हा प्रकल्प गेला तरी तो या देशातच राहणार आहे. गुजरात काय पाकिस्तानात नसल्याचा टोलाही पवार यांनी लगावला. याच वेळी हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये यासाठी पर्यायी जागेचा विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

आपली प्रतिक्रिया द्या