शिवसेनेची वचनपूर्ती, मुंबईकरांसाठी प्रदूषणमुक्त बससेवा

सामना ऑनलाईन । मुंबई

धूर आणि घरघरणारा आवाज नसलेली प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक बस आज ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल झाली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण वडाळा ‘बेस्ट’ बस डेपोत झाले. प्रदूषणमुक्त आणि आरामदायी प्रवास असलेली बस महाराष्ट्रातील पहिलीच हायटेक बस ठरली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतील ही बस मुंबईकरांसाठी आणण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते.

फोटोगॅलरी

मुंबईसह देशभरातील मोठय़ा शहरांमध्ये गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’मध्ये प्रदूषणविरहित बस आणण्याची संकल्पना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. या पार्श्वभूमीवर २०१५च्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार बॅटरीवर चालणाऱया सहा बस गोल्ड स्टोन इफ्राटेककडून घेण्यात आल्या आहेत. प्राथमिक स्वरूपात फोर्ट परिसरात या बस फेऱया चालवण्यात येणार आहेत, तर टप्प्याटप्प्याने या बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. या बसच्या लोकार्पण सोहळय़ास उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, सुधार समिती अध्यक्ष अनंत (बाळा) नर, ‘बेस्ट’ महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे, आरोग्य समिती अध्यक्षा रोहिणी कांबळे, माजी महापौर स्नेहल आंबेकर, श्रद्धा जाधव, तृष्णा विश्वासराव, नगरसेवक अमेय घोले, संजय घाडी, माजी नगरसेवक यशोधर फणसे, बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत, राजेश कुसळे, अतुल शहा आदी उपस्थित होते.

अशी आहे इलेक्ट्रिक बस

– संपूर्णपणे बॅटरीवर चालणाऱ्या सहा गाडय़ा
– एका गाडीची किंमत १.६ कोटी
– उद्यापासून नरीमन पॉइंट ते चर्चगेट परिसरात चार बस धावणार
– चालक आणि ३१ प्रवासी बसण्याची व्यवस्था
– प्रत्येक चार्जिंगनंतर २०० कि.मी. चालण्याची क्षमता
– आरामदायक आसने, पॅसेंजर ऍरेजमेंट सिस्टम
– इलेक्ट्रिक असल्यामुळे गिअर, क्लचसारख्या यंत्रणा ५० टक्क्यांनी घटणार

‘आरे’तील मेट्रो कारशेड हटवा

मुंबईकरांच्या सेवेसाठी ‘मेट्रो’ रेल्वे हवीच आहे. ‘मेट्रो’ला आमचा विरोध नाही. मात्र ‘मेट्रो’ कारशेडमुळे जर हजारो झाडांवर कुऱहाड येत असेल तर असला पर्यावरणाचा नाश करणारा विकास नको, असे ठाम प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. ‘आरे’तील प्रस्तावित कारशेड इतर ठिकाणी न्या, असे आवाहनही त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या