परिधान

>> पूजा पोवार, फॅशन डिझायनर

उन्हाळ्यातील विवाहमुहूर्त न टाळता येण्याजोगे. विवाहासाठी भरजरी कपडे घालायलाच हवे. पण उन्हाचा ताप आणि सुसह्य कपडे यांचा ताळमेळ कसा घालायचा…

सध्या विवाह सोहळय़ाचे दिवस आहेत. घरातले किंवा जवळचे मित्र-मैत्रिण कोणाचेही लग्न असो… लग्न सोहळय़ाला सगळेच जण एकत्र येतात. उन्हाळय़ात होणाऱ्या विवाहांना विशेष महत्त्व आहे. या दिवसांत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय सगळय़ांचीच एका ठिकाणी भेट होते. हिंदू विवाह पारंपरिक पद्धतीने होत असल्यामुळे यामध्ये विधींप्रमाणेच कपडय़ांनाही फार महत्त्व आहे.

उन्हाळय़ाच्या दिवसांत उकाडय़ामुळे आधीच आपण वैतागलेले असतो. त्यामुळे लग्नाला जाताना कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करायचे हा प्रश्न पडतो. अशा वेळी प्रत्येक वेळी भरजरी, गडद रंगाच्या कपडय़ांनाच प्राधान्य दिले जाते, मात्र आता काळ बदलला आहे. ब्राइट रंगाचे, अंगाला चिकटणार नाहीत असे, ज्यामध्ये आत्मविश्वासाने वावरता येईल असे कपडे घालण्याकडे हल्ली पाहुण्यांचा कल वाढत आहे.

उन्हाळय़ातल्या विवाह समारंभासाठी पोषाख

– हलक्या रंगाचे फॅब्रिक (लाईट फॅब्रिक), सिल्कचे कपडे या वेळी वापरावेत. यामध्ये साडय़ा, ड्रेसेसही आवडीच्या पॅटर्ननुसार ज्यावर भरतकाम करून वापरता येतात.

– सध्या क्रीम रंगाच्या कपडय़ांचा ट्रेंड सुरू आहे. यामध्ये लखनवी किंवा चिकनकारी फॅब्रिक वापरता येतात.

– जरदोसी नक्षीकाम केलेले, फ्लोरल डिझाइन असलेले कपडे शरीराला थंडावा देतात. भरतकाम केलेले कपडेही विवाह सोहळय़ात इतरांना आकर्षित करतात.

– ब्राइट रंगाच्या साडय़ा यामध्ये जास्त भरतकाम नसेल तरीही चालेल. ब्राइट रंगाची शिफॉन साडी, जरीकाठाची साडीही छान दिसते.

– खूप घट्ट, अंगाला टोचणारे कपडे ज्यामुळे शरीरावर चट्टे येतील असे भरजरी कपडे या दिवसांत घालू नयेत. त्याऐवजी हलके, सैलसर कपडे वापरावेत. यासाठी सध्या बाजारात परकर-टॉप त्यावर दुपट्टा अशी फॅशन सुरू आहे.

– सिल्कच्या कपडय़ांमध्ये लाइट पेस्टल शेडस्चे कपडे. चारचौघांत उठून दिसायलाही मदत करतात.

– पुरुषांनी नेहमीच पांढऱ्या रंगापेक्षा लाल किंवा हिरव्या रंगाची शेरवानीही परिधान करायला हरकत नाही.

– निळय़ा रंगाचे पोषाख यामध्ये साडय़ा, ड्रेसेसही या दिवसांत शीतलता निर्माण करतात.

तरुण मुला-मुलींसाठी

– तरुण मुला-मुलींसाठी बाजारात कॉटन कुर्ता आणि शर्ट उपलब्ध आहेत. समारंभात स्टायलिश दिसण्यासाठी मुली या कुर्त्याचा वापर करू शकतात. तसेच खास समर कलेक्शनमध्ये जॉर्जेट मॅक्सीसुद्धा उपलब्ध आहे.

– उन्हाळय़ात खास करून कपडय़ांमध्ये पीच, लेमन, स्काय ब्लू आणि ग्रे कलर लोकप्रिय असतात. पारंपरिक पोशाखामध्ये बाजारात चिकनचे ड्रेसेस् आणि ओढणीसुद्धा उपलब्ध आहेत. यामुळे ट्रेण्डी आणि फॅशनेबल दिसण्यास मदत होते.

– मुलांसाठी निरनिराळय़ा प्रकारचे फॅशनेबल कपडे बाजारात आहेत. खास करून लिनिन टेंसिल फॅब्रिक कपडय़ांचा उन्हाळय़ात वापर केला तर ते आरामदायी आणि फायदेशीर ठरेल.