बांगड्या… एक सुंदर दागिना

526

>>पूजा तावरे, फॅशन डिझायनर

बांगड्या… एक सुंदर दागिना. चुडा ते आजच्या फॅशनेबल बांगड्या… सुंदर प्रवास.

बांगड्या म्हटलं की, मुलींसाठी आवडती गोष्ट. लग्नप्रसंगी बांगड्यांना महत्त्वाचे स्थान असते. सध्या केवळ काचेव्यतिरिक्त प्लॅस्टिक, लाकूड, लाख, धातू, मोत्यांपासून बनविलेल्या विविध रंग, आकारातल्या बांगड्यांची क्रेझ तरुणींमध्ये आहे. फॅशनच्या युगात केवळ गोलच नव्हे, तर चौकोनी, षटकोनी, त्रिकोणी अशा वेगवेगळ्या बांगड्यांचे व ब्रेसलेटचे प्रकार उपलब्ध आहेत. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनेबल बांगड्या पाहायला मिळतात. वेस्टर्न लूक असणाऱ्या या बांगड्यांना राजस्थानी तसेच जयपुरी टच आहे. हिंदुस्थानी आणि पाश्चात्त्य डिझाईन्स यांचा सुरेख संगम या बांगड्यांमध्ये दिसून येतो. पोलकी बांगड्या, अमेरिकन डायमंड, स्टोन, मोतीवर्क केलेल्या बांगड्यांनाही मागणी आहे. आजकाल ट्रेंडी बॅगल्सची फॅशन टॉपवर आहे. या फक्त दिसायलाच सुंदर नाहीत, तर वापरण्यास पण कम्फर्टेबल्स आहेत.

थेड बँगल्स

कोटेड आणि थ्रेडच्या फंकी बँगल्सची तरुणींमध्ये मागणी आहे. यामध्ये दोन रंगांबरोबर मिक्सिंग केले जाते. ब्राईट कलरचा जास्त वापर केला जातो. रेशमी धाग्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या या बांगड्या स्ट्रेचेबल असतात. या बांगड्या तुम्ही सगळ्या ड्रेसवर कॅरी करू शकता.

टेडिशनल कडे

लाकडाची गोल, झिगझॅग, चौकोनी, षटकोनी या आकारातील सुंदर बांगड्या आणि कडे बनवले जातात. यावर विविध रंगांचे पेंटिंग आणि पॉलिश केले जाते.यामध्ये सोने, चांदी, मेटल यांसारख्या धातूंच्या बांगड्यादेखील उपलब्ध आहेत.

रबर बँगल्स

या बँगल्स जाड आणि पातळ दोन्ही आकारात असतात. यांच्यामध्ये मल्टिकलर बांगड्यासुध्दा आहेत. या बांगड्या वेस्टर्न किंवा इंडियन ड्रेसवर वापरून ट्रेंडी लूक मिळवता येतो.

वुडन ट्रेंड

बाजारात फॅशनेबल बांगड्या आणि कडी आली आहेत. ज्यामध्ये वुडन कड्यांना पसंती मिळत आहे. लाकडाचा गोल, झिगझॅग आणि चौकोनी आकारात कापून सुंदर बांगड्या आणि कडे बनवले जातात आणि त्यावर विविध रंगांनी पेंटिंग आणि पॉलिश केले जाते.

क्रिस्टल बँगल्स

क्रिस्टल बँगल्स थोड्या जाड  असून त्या जास्त शाईन करत नाहीत.  पांढरा, ऍक्वा, हिरवा, निळा, गुलाबी, पिवळा  अशा लाईट रंगांमध्ये या बांगड्या उपलब्ध  आहेत. सध्या चमकणाऱ्या/स्पार्कल बांगड्या फॅशनमध्ये आहेत. त्या सर्व ड्रेसवर मॅच   होतात. गोल, चौकोनी, ओव्हल, त्रिकोणी, स्टार अशा आकारात उपलब्ध आहेत. यामध्ये गुलाबी, हिरवा, निळा, चंदेरी रंगांची चलती आहे.

स्टायलिश लूक

ऍल्युमिनियम व मेटलच्या स्लिम बँगल्स हिरवा, लाल, निळा, गोल्डन, चंदेरी, पिवळा अशा सुंदर रंगांमध्ये उपलब्ध आहेत. मल्टिशेडस् आणि स्लिम शेपमुळे प्रत्येक ड्रेसवर या बांगड्या मॅच होऊ शकतात. वेस्टर्न ड्रेसबरोबर ट्रडिशनलवर पण चांगला लूक मिळतो.मल्टिकलर्ड बांगड्या छान वाटतात. भरपूर रंगांमुळे त्या कोणत्याही ड्रेसवर पटकन मॅच होतात. काही वर्षांपूर्वी बांगड्या म्हणजे आऊटडेटेड वाटायच्या, पण आता त्यातल्या नावीन्यतेने तरुणींमध्ये परत बांगड्यांची क्रेझ निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या